आता व्हिसाशिवाय फिरा थायलँड !
बातमीदार | २ नोव्हेबर २०२३
देशभरातील अनेक नागरिकांना पर्यटन करण्यासाठी अनेक देशात जाण्याचे स्वप्न असते पण कधी कधी व्हिसा नसताना हे स्वप्न पूर्ण होवू शकत नाही पण आता थायलँडला जाण्यासाठी भारतीयांना आता व्हिसाची गरज नाही. तुम्ही फक्त भारतीय पासपोर्टच्या आधारावर अख्खा थायलँड मनसोक्त फिरू शकता. कारण थायलँड सरकारने येत्या १० नोव्हेंबर ते पुढील वर्षी १० मे पर्यंत भारतीयांना व्हिसामुक्त प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या व्हिसामुक्त धोरणांतर्गत एकदा थायलँडमध्ये गेलेला व्यक्ती ३० दिवसांपर्यंत तेथे राहू शकतो. थायलँडला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीयांची संख्या मोठी असते. या देशात सर्वाधिक पर्यटक मलेशियातून येतात. यानंतर चीन आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो. थायलँडला पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भारतीय चौथ्या स्थानी आहेत. गेल्या १० महिन्यांत १२ लाख भारतीय थायलँडला गेले होते. वर्षाकाठी सुमारे ३ कोटी विदेशी पर्यटकांनी आपल्या देशात यावे, असे लक्ष्य थायलँड सरकारने निर्धारित केले आहे. या देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर आधारित आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी या देशाने गत महिन्यात चिनी नागरिकांसाठी व्हिसामुक्त प्रवेशाची घोषणा केली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम