देशात एक लाख टन सोन्याचा साठा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑक्टोबर २०२३

भारतामध्ये एक ग्रॅमही सोन्याची निर्मिती होत नसताना सध्याच्या घडीला देशात एक लाख टन सोन्याचा साठा असण्याची शक्यता सोने व्यावसायिक व सराफी अभय गाडगीळ यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने आयोजित सोन्याचा दर्जा, शुद्धता आणि होणारी फसवणूक याबाबत गाडगीळ यांनी रोटरी सदस्यांना पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनद्वारे प्रबोधन केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने मंगळवारी दि. १७ अभय गाडगीळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सोन्याचा इतिहास, सोन्याच्या खाणी आणि सोन्याच्या निर्मितीबाबत रोटरी सदस्यांना अवगत केले. सध्याच्या घडीला चीन जगात सर्वांत जास्त सोने निर्माण करणारा देश म्हणून आघाडीवर आहे. भारतात एक ग्रॅमही सोने तयार होत नाही, मात्र, सध्याच्या घडीला देशात एक लाख टन सोन्याचा साठा आहे. सर्वसामान्य नागरिकांकडे २५ हजार टन सोने असून, देशातील मंदिरांमध्ये चार ते पाच हजार टन सोने पडून आहे. दक्षिण भारतातील पद्मनाभ मंदिरात १३०० टन सोने सापडल्याचे त्यांनी सांगितले.

सोने खरेदी करणे हे भारतात पवित्र कार्य समजले जाते. सोने हा एकमेव असा धातू आहे की, तो कोणत्याही देशात जाऊन आपण विकू शकतो. तन्यता हा गुणधर्म असल्यामुळे सोन्याला सर्वाधिक मागणी आणि किंमत आहे. भारतीयांना सोन्याचे अप्रूप असल्यामुळे सोने खरेदी सर्वाधिक असते. गेल्या वर्षी ३४४० टन सोने भारताने आयात केले आहे. सोने खरेदी करणे ही बाब अत्यंत जोखमीची असते, त्यामुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोन्याचा एक दागिना तयार करण्यासाठी सात ते आठ दिवस लागत असल्यामुळे विविध दागिन्यांवर विविध प्रकारची मजुरी लागत असते. दागिन्यांनुसार घटही होत असल्यामुळे सोने निर्मितीमागचे कष्ट ग्राहकांनी जाणून घेतल्यास सराफांची मानसिकता समजून येऊ शकते, असे गाडगीळ यांनी सांगितले. रोटरीचे अध्यक्ष मंगेश अपशंकर यांनी प्रास्ताविक केले, तर सलील केळकर यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम