पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून धाडकन खाली ; सांगितला अनुभव !
दै. बातमीदार । १६ जानेवारी २०२३ । राष्ट्रवादीचे नेत्या सुप्रिया सुळे यांच्या साडीने एका कार्यक्रमात पेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या लिफ्टला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट धाडकन खाली आली होती. अन्यथा आज श्रद्धांजली वाहायचा कार्यक्रम घ्यावा लागला असता, अशी मिश्कील टिप्पणी करत अजित पवार यांनी आपल्या अपघाताची माहिती दिली. बारामती येथील उद्घाटन प्रसंगावेळी शनिवारी ही घटना घडली.
अजित पवार यांनी आपल्यासोबत घडलेल्या अपघाताची माहिती देत आपण सुखरूप असून जास्त ईजा झालेले नसल्याचे सांगितले. अजित पवार म्हणाले, मला 11 पर्यंत मुंबईत पोहोचायचे होते. कारण गेल्या काही दिवसात कसे अपघात होतात, तुम्ही बघताय. विचारता काही सोय नाही. काल दिवसभर हे मी कुणाला सांगितले नाही. परंतु, तुम्ही माझ्या घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले, काल दिवसभरात मी दोन रुग्णालयांचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर आम्ही चौथ्या मजल्यावर जात होतो. परंतु, तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तिथेच बंद झाली. अंधार गुडूप. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट धाडकन खाली आली. थोडक्यात वाचलो. अन्यथा आज श्रद्धांजली वाहायला लागली असती. माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक देखील होते. या घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आले. परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो. असे अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले, बाहेर आल्यानंतर कुणाला काही सांगितले नाही. मी घरी पत्नीलापण बोललो नाही. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. आईला नमस्कार करायला गेलो होतो. नाहीतर कालच याची ब्रेकिंग न्यूज झाली असती. हार्डीकर डॉक्टर यांना थोडे लागले. मात्र, सर्व सुखरूप आहोत. असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम