वादळी वारा आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या – रोहिणी खडसे

बातमी शेअर करा...

बोदवड – सध्या जळगाव जिल्ह्यात प्रचंड उन्हामुळे तापमान 45 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. या उष्णतेत काल संध्याकाळी मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यात आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तसेच शेती, घरांचे आणि जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रविवार रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा, चिचखेडा सिम, लहान मनुर, ऐनगाव चिखली येथे नुकसानीची पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना धीर दिला आणि प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत चर्चा करून तात्काळ भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश दिले. आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

रोहिणी खडसे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असतानाही अचानक आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मार्च महिन्यातील वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, आणि आता आणखी एक संकट त्यांच्यावर आले आहे. केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच घरांवरील पत्रे उडून गेले आहेत, जनावरांच्या गोठ्यातील चारा भिजल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिचखेडा सिम येथे कडुनिंबाचे झाड उन्मळून पडल्याने बाळू पाटिल यांच्या बैलजोडीचा मृत्यू झाला आहे. विद्युत तारा तुटून गोठ्याला आग लागल्याने शेतीपयोगी साहित्य जळून गेले आहे.

खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्यासोबत संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदतीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत आणि विमा कंपन्यांना निर्देश देण्याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना, ती शिथिल करून तात्काळ मदत मिळावी यासाठी निवडणूक आयोग आणि सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

या वेळी रामदास पाटील, कैलास चौधरी, पांडुरंग पाटिल, सुभाष पाटिल, विनोद कोळी, रामराव पाटील, किरण वंजारी, शाम सोनवणे, नईम बागवान, अतुल पाटिल, दिलीप पाटिल, शांताराम बोरसे, प्रवीण पाटील, अमोल बोरसे, प्रकाश पाटिल, दीपक किनगे, महेंद्र बोंडे, आकाश प्रकाश पाटील, राजू फिरके, सुरेश तिडके, पराग फिरके, प्रबोध पाटील, अमोल हळपे, सुरेश धनगर, धनराज पाटील, अमोल सोनवणे, विकास पाटील, प्रकाश वाघ, लीना वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम