दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणार ‘पेन्शनचा शंखनाद आंदोलन !
बातमीदार | २२ सप्टेंबर २०२३
देशातील जवळपास १० लाख कर्मचारी, १ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या ‘पेन्शन शंखनाद रॅली’ च्या माध्यमातून देशभरातील १० लाख कर्मचारी तर महाराष्ट्रातील ३० हजार कर्मचारी आपली कर्मचारी एकतेची ताकद केंद्र सरकारला दाखवणार आहेत. या राष्ट्रीय पेन्शन आंदोलनासाठी देशभरातील कर्मचारी जय्यत तयारीत आहेत.
या राष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन राष्ट्रीय जुनी पेन्शन चळवळ संघटना (NMOPS, India) चे अध्यक्ष विजय कुमार बंधू व NMOPS चे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. देशभरात होत असलेले शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण व शेअर बाजारावर आधारित असलेली नवीन पेन्शन योजना हटवून पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना बहाल करणे व शासकीय नोकऱ्यांचे बाजारीकरण थांबवणे यासाठी हे राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास (voteforops) वोट फॉर ओपीएसच्या माध्यमातून कर्मचारी सत्तांतर करून दाखवतील हा इशाराही दिला जाणार आहे.
पेन्शन शंखनाद आंदोलनासाठी साडे तीन लाख रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यात आल्याचे समजते आहे. तसेच उर्वरित कर्मचारी खाजगी वाहनाने, विमानाने दिल्ली येथे ३० सप्टेंबर रोजीच दाखल होणार आहेत. आंदोलनाची तयारी म्हणून ‘एकच मिशन! जुनी पेन्शन!, पुरानी पेन्शन योजना बहाल करो!, शासकीय नोकरीचे खाजगीकरण हटवा!, पेन्शन शंखनाद आंदोलन लिहिलेले टी-शर्ट, टोप्या बनवण्यात आले आहेत. मागण्यांसंदर्भात विविध हँड बॅनरही बनवण्यात आले आहेत. देशभरातील विविध खात्यातील केंद्रीय तसेच राज्य कर्मचारी मोठ्या संख्येने दिल्लीत धडकणार आहेत. तसेच येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत कर्मचारी मतपेटीतून आपली ताकद VoteforOPS मोहिमेच्या माध्यमातून शासनास दाखवून देणार आहेत. देशातील अनेक राज्ये आजही जुनी पेन्शन योजना लागू करण्यास तयार आहेत मात्र केंद्र शासनाच्या अडेल भूमिकेमुळे राज्य शासनाचा नाईलाज होत आहे. केंद्र शासनाने सरसकट देशात जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास केंद्रातील शासनाला पायउतार करण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. हेच या आंदोलनातून कर्मचारी दाखवून देणार आहेत.
शंखनाद रॅलीसाठी मुंबई ते दिल्ली सायकलवारी मालेगाव (नाशिक) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. डी. निकम हे शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच १ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या शंखनाद आंदोलनात जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे म्हणून ३ सप्टेंबर पासून मुंबई ते दिल्ली सायकलवारीस निघाले आहेत.१ ऑक्टोबरला ते दिल्लीत आंदोलनात सहभागी होणार आहेत.
“कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे. जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास लोकसभा निवडणुकीतच केंद्र सरकारला VoteforOPS चा प्रभाव दिसेल.” – वितेश खांडेकर, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
“कश्मीर से कन्याकुमारी तक के कर्मचारी १ अकटुबर के शंखनाद रॅली में सम्मेलीत होने वाले है। हमारे प्रधानमंत्रीजी सें निवेदन है की वह जल्द से जल्द पुरानी पेंशन बहाल करे अन्यथा इसका खाजीयाज केन्द्र सरकार को लोकसभा चुनाव में भुगतना पड सकता है।” – विजयकुमार बंधू, राष्ट्रीय अध्यक्ष, NMOPS
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम