राजस्थानात प्रियंका गांधीचा जोरदार प्रचार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ नोव्हेबर २०२३

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व पक्ष सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी बुधवारी झंझावाती प्रचार केला. देशात तातडीने जातनिहाय जनगणना करणे व मणिपूरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगण्याच्या मुद्द्यावरून दोघांनीही जोरदार हल्ला चढवला. मोदींनी अहमदाबादमध्ये जाऊन क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहिला. पण त्यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देणे टाळले, असा टोला प्रियंकांनी लगावला.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी अनुक्रमे धौलपूर आणि जयपूर जिल्ह्यातील शाहपुरा येथे जाहीर सभा घेतली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, भारतीय क्रिकेट संघ मेहनतीने अंतिम फेरीत पोहोचला. जर भारताने बाजी मारली असती तर थोडे श्रेय लाटता आले असते, या भावनेपोटी मोदी सामना पाहण्यासाठी तिथे गेले पण मागील सात महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. तरीही मोदींनी मणिपूरला भेट देणे टाळले, असा टोला प्रियंकांनी लगावला. अभिमान आणि सन्मान मिळणाऱ्या ठिकाणी जायचे व संकटमय परिस्थितीपासून दूर राहा, अशी मोदींची भूमिका असल्याची टीका प्रियंकांनी केली. मोदी स्वतःला फकीर असल्याचा दावा करतात. पण त्यांच्या राजवटीत भाजप सर्वात श्रीमंत पक्ष कसा बनला ? असा सवाल प्रियंकांनी उपस्थित केला.

केंद्र व राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे अदानी व इतर बड्या उद्योगपतींसाठी काम करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्राने बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. पण गरिबांची उपेक्षा केल्याचा आरोप प्रियंकांनी केला. राहुल गांधी धौलपूरमध्ये म्हणाले की, राजस्थानमध्ये व केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्याने जातनिहाय जनगणना केली जाईल. देशातील दलित आणि मागासवर्गीय लोकांना त्यांची खरी लोकसंख्या माहीत असणे आवश्यक असल्याने जात जनगणना आवश्यक आहे. आजघडीला देशात संपत्तीचे वितरण होत आहे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे उत्तर आपल्याला केवळ जातगणनेतून मिळेल, असे राहुल गांधींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणतात. पण मी जातनिहाय जनगणनेची मागणी करताच देशात ‘गरीब’ हीच एकमेव जात शिल्लक राहिल्याचे सांगत मोदी पळ काढत असल्याची टीका राहुल यांनी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम