रश्मी ठाकरे येवू शकतात राजकारणात ; शिंदे गटातील नेत्याचे मोठे विधान !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जुलै २०२३ ।  शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे राजकारणात येऊ शकतात, असा दावा ठाकरेंना झटका देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत जाणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. रश्मी ठाकरेंची भूमिका उद्धव यांना पूरक असते. त्यामुळे त्या राजकारणात येऊ शकतात, असे त्या म्हणाल्यात.

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गत काही दिवसांत अनेक धक्के बसले. मनिषा कायंदे व शिशिर शिंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नुकताच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांच्याविषयी एक मोठा दावा केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, रश्मी वहिनी गृहिणी आहेत. त्यांची भूमिका नेहमीच उद्धव ठाकरेंना पूरक असते. त्या उत्साही व क्रियाशील आहेत. त्या राजकारणात येऊ शकतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

यावेळी त्यांनी आपण कोणतेही पद डोळ्यापुढे ठेवून शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचेही स्पष्ट केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आजारी पडल्यानंतर आमची चर्चेची कवाडे बंद झाली. आता त्यांना जास्त त्रास नको म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाल्या. मी राजीनामा दिल्यानंतरचे पत्रक उद्धव ठाकरेंना पाठवले होते. त्यावर त्यांनी नमस्कार व स्मायली पाठवून प्रतिक्रिया दिली. त्यावरून मी सोडून जाणार असल्याची कुणकुण त्यांना अगोदरच लागली असावी असे मला वाटते. उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या अपेक्षेनुसार त्यांना वेळ दिला नाही, असेही नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा काही बाबतीत नाहक बळी जात असल्याचा दावा विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेल्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला. नीलम गोऱ्हेंनी बुधवारी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्याविषयी वेगळे विधान केले.

संजय राऊत यांनी मला कायम मदत केली. त्यांनी मला आमदारकीच्या वेळीही सहकार्य केले. माझ्यासाठी शब्द टाकला. त्यामुळे त्यांच्याविषयी मी फारसे बोलत नाही. पण त्यांच्या पत्रकार परिषदेवर बोलायचे झाल्यास, शिवसेनेचा प्रत्येक प्रवक्ता ज्यावेळी काही बोलतो तेव्हा त्याला पक्षाकडून जे सांगितले जाते तेच तो बोलत असतो. त्यानुसार, आक्रमकपणे भूमिका मांडणारा नेता म्हणून संजय राऊतांकडे ती भूमिका आली होती. त्याचा संजय राऊतांना खूप त्रास झाला. मला वैयक्तिक असे वाटते की, संजय राऊत यांचा यात विनाकारण बळी गेला, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम