‘श्री रामाच्या जयघोषात होणार जळगावात रथोत्सवाला सुरुवात !
बातमीदार | २३ नोव्हेबर २०२३
गेल्या दीडशे वर्षापासून जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावतर्फे यंदाही भव्य श्रीराम रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कार्तिकी प्रबोधिनी एकादशीनिमित्त गुरुवार, दि. २३ रोजी रथाची पूजा श्रीराम मंदिर संस्थान येथे होऊन दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामाच्या जयघोषात रथोत्सवाला प्रारंभ होणार आहे. रथाच्या मार्गावर रथाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसणार आहे.
श्रीराम मंदिर संस्थानमध्ये गुरुवार, दि. २३ रोजी पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सात वाजता महाआरती, साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन, त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांच्या हस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेद मंत्र घोषात केले जाणार आहे. यावेळी राजकीय, सामाजिक यासह सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती देखील लावणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम