मंदाकिनी खडसे यांना दिलासा : भोसरी भूखंड प्रकरणात जामीन मंजूर !
बातमीदार | १४ ऑक्टोबर २०२३
भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या आर्थिक अफरातफरीच्या गुन्ह्यात मंदाकिनी खडसे यांना दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्याचा सशर्त जामीन मंजूर केला.
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी केली होती. त्या तक्रारीच्या आधारे बंड गार्डन पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडसे यांनी मंत्री असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करून भोसरी परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीची ४० कोटी रुपयांची जमीन पत्नी आणि सुनेच्या नावे ३.७५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला. या प्रकरणात ईडीने चौकशी सुरू करीत २०२१ मध्ये गुन्हा दाखल केला. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय शुक्रवारी जाहीर करताना त्यांना मोठा दिलासा दिला. न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना २ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. याचवेळी त्यांना पुराव्यांमध्ये छेडछाड करू नये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, अशा अटी घातल्या आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम