रोहित पवारांना दिलासा : नोटिशीला स्थगिती !
बातमीदार | ३० सप्टेंबर २०२३
राज्यातील शरद पवार गटाचे आ.रोहित पवार मोठ्या अडचणीत सापडले होते पण त्यांना आता दिलासा मिळाला आहे. बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीचे दोन प्लांट बंद करण्यासंबंधित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीमुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती नितीन जमादार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीचे दोन प्लांट बंद करण्यासंबंधित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीला अंतरिम स्थगिती दिली. तसेच कंपनीविरोधात ६ ऑक्टोबरपर्यंत कुठलीही कारवाई करू नका, असा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीला नोटीस पाठवली आणि दोन प्लांट बंद करण्यासाठी ७२ तासांचा अल्टिमेटम दिला. आमदार रोहित पवार यांनी ही कारवाई राजकीय सूडभावनेने केली जात असल्याचा आरोप करत शुक्रवारी सकाळी अॅड. अक्षय शिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयात रोहित पवार यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अॅड. जे. पी. सेन यांनी युक्तिवाद केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी पहाटे बजावलेल्या नोटिसीलाच त्यांनी आक्षेप घेतला. पहाटे दोन वाजता नोटीस बजावून ७२ तासांच्या आत म्हणजेच शनिवारपर्यंत कंपनी बंद करण्याचा अल्टिमेटम देण्यामागे राजकीय षडयंत्र आहे, असा दावा करत कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्याची विनंती त्यांनी केली. खंडपीठाने त्यांची विनंती मान्य करतानाच याचिकेवर ६ ऑक्टोबरला सुनावणी निश्चित केली
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम