आता दौलताबाद किल्ल्याला “देवगिरी” किल्ला करणार : मंगलप्रभात लोढा
दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागातर्फे देवगिरी किल्ल्यावर विशेष सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, लोकमत वृत्त समुहाचे चीफ एडिटर राजेंद्र दर्डा, ज्येष्ठ सामाजिक कायकर्ते देवजीभाई पटेल आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समीतीचे सह-संयोजक ॲड. आशीष जाधव उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्रीमती ताराबाई लड्डा व स्वामी रामानंद तीर्थ यांचे पणतू डॉ. शिरीष खेडगीकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलतांना लोढा यांनी दौलताबाद या यादवकालीन ऐतिहासिक किल्ल्याचे मुळ नाव देवगिरी असुन भविष्यात याच नावांने हा किल्ला ओळखला जाईल असे सांगितले. तसेच दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी किल्ल्यावरील भारतमाता प्रांगणात मराठवाडा मुक्तीदिनाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असेही ते म्हणाले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या किल्ल्यावर लवकरच साउंड आणि लाईट शो सूरू करण्यात येईल असे घोषित करतांना जिल्हयातील पर्यटनस्थळांचा शाश्वत विकास करण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी सहकार्य करेल असे नमुद केले. तसेच राजेंद्र दर्डा यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील विविध पैलुंचा वेध घेताना या लढयातील महिलांच्या मोठ्या सहभागाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तर ॲड. आशीष जाधवर यांनी देवगिरी किल्ल्याचा इतिहास आणि मराठवाडा मुक्ती संग्राम हे भावी पिढ्यांना संघर्षाची प्रेरणा देत राहतील असे सांगितले. यावेळी भारतमाता प्रांगणात ध्वजवंदन व राष्ट्रगीत, मराठवाडा मुक्तीसंग्रामावर आधारित पोवाडा आणि सामुहिक संपूर्ण वंदे मातरम असे कार्यक्रम उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सुमारे ५०० विद्यार्थी, टुर ऑपरेटर्स, गाईडस, शहरातील सन्माननीय नागरिक व स्वातंत्र्यसैनिकांचे कुंटुबीय उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर, पर्यटन उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, दौलताबाद गावचे सरपंच पवन गायकवाड आदींची उपस्थिती होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम