बचावकार्य वेगात सुरु ; अमित शहांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा !
दै. बातमीदार । २० जुलै २०२३ । राज्यात सुरु असलेल्या पावसाने मोठा कहर माजविला असतांना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून या घटनेची माहिती घेतली आहे. सध्या प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबाबत म्हटले आहे की, एनडीआरएफच्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या असून स्थानिक प्रशासनासह ते बचावकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढणे व जखमींवर तातडीने उपचार करणे, याला आम्ही प्राधान्य देत आहोत. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे. असे असले तरी पाऊस थोडासा उघडल्यावर तातडीने हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात भरती केली जाईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. रस्ता नसला तरी जास्तीत जास्त वेगाने मदतकार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम