…अंदाज होता रोहित पवारांची भावनिक प्रतिक्रिया !
दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घटना रविवारी घडली असून आता राष्ट्रवादीचे अनेक नेते शरद पवार यांच्या सोबत आहे तर पवारांचे राजकीय वारसदार म्हणून आ.रोहित पवार देखील शरद पवार यांच्या सोबत असून त्यांनी या विषयी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रोहित पवार म्हणाले कि, भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने शिवसेना फोडली तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील होईल, असा आम्हाला अंदाज होता. अजित पवार यांच्या बंडानंतर मी भावनिक झालो असल्याचे देखील ते म्हणाले. अजित पवार आणि माझं नाते व्यक्तिगत आणि भावनिक आहे. राजकारण बाजूला ठेवले तर नक्कीच मी भावनिक झालो आहे. ते माझे काका आहेत आणि त्यांनी अनेक वेळा मला साथ दिली असल्याचे देखील रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार म्हणाले की, काल जे घडलं ते वर्षभरापासून महाराष्ट्रात घडत आहे. यावर मतदारांचे असे म्हणणे आहे की, राजकारण गल्लीच्छ झाले आहे. आम्ही मत देऊन चूक केली असे त्यांना वाटू लागले आहे. केवळ मतदारच नाही तर एक ध्येय आणि एक विचार घेऊन राजकारणात आलेला आमच्यासारख्यांना देखील राजकारणात येऊन चूक केली का? असा प्रश्न पडला, असल्याचे ते म्हणाले. लोकांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा अनेक जण स्वतःबद्दल, स्वतःची खुर्ची कशी टिकवता येईल, स्वतःची उद्दिष्ट कशी पूर्ण करता येतील, यात गुंतलेले असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोनच लोकनेते आहेत. महाराष्ट्राच्या मनामध्ये लढणं लिहिलेले आहे. हा विचार पुढे नेत शरद पवारांनी सामान्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. सामान्यांचे लोकांचे नेते कसे असतात, हे यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्याकडे पाहून कळते. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना अशाच लोकांकडून प्रेरणा मिळत असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच जुलै रोजी सर्व आमदारांची आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व भूमिका स्पष्ट होईल, असे देखील रोहित पवार यांनी सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम