‘साधना’ गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक : सुश्रूती संथानम
"हाऊ गांधी कम्स अलाइव्ह"मध्ये संगीत कार्यशाळा संपन्न
दै. बातमीदार । ९ ऑक्टोबर २०२२ । जळगाव येथील संगीतामध्ये ज्याप्रमाणे साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचप्रमाणे गांधीजींच्या जीवनाचा साधना अविभाज्य घटक होता. समाजाला सोबत नेण्याची ताकद कलाकाराच्या साधनेत आहे, त्याद्वारे अनेक गोष्टी साधता येतात असे प्रतिपादन पुणे येथील दक्षिणा द्वारका फाऊंडेशनच्या सुश्रूती संथानम यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशन व इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी जयंती’ व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने “हाऊ गांधी कम्स अलाइव्ह” अंतर्गत संगीत विषयावर कार्यशाळेत सुश्रूती संथानम बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संशोधन विभागाच्या डीन प्रा. गीता धर्मपाल, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या प्रशासकीय प्रमुख सौ. अंबिका जैन, बैठक फाऊंडेशनचे मंदार करंजकर, दाक्षायणी आठल्ये व पार्थ ताहाराबादकर उपस्थित होते.
संगीत, सभ्यता व भारतीय समाज याविषयावर बोलतांना सुश्रूती संथानम पुढे म्हणाल्या कि, भारतीय संगीताला दोन हजार वर्षांची परंपरा असून यादवांनी व तात्कालिक राजांनी संगीताला राजाश्रय दिला. आपल्या परंपरांवर आधारित सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे. संगीत कलाकाराची ओळख असून ती स्मृतिवृद्धीचे कार्य करते. संगीत माणसांना एकत्रित आणण्याचे काम करते. समाजाने रसिक बनून संगीताचा आनंद घेत असताना जाणकारांची भूमिका साकारली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भोजनोत्तर सत्रात मंदार करंजकर व दाक्षायणी आठल्ये यांनी ‘संगीताचा मानवी शरीर, मन व विचारानुसार होणारा परिणाम’ यावर सादरीकरणाद्वारे समजावून सांगितले. संगीतातून निर्माण होणारी कंपने शरीरातील अंतर्गत अवयवांची मसाज करते. शरीरातील प्रत्येक अवयवांची क्षमतावाढीचे काम संगीत करते. पुढच्या सत्रामध्ये गाण्यातील सौंदर्य स्पष्ट करताना त्यातील लय, सूर व ताल याचे महत्वही त्यांनी विशद केले. भारतीय संगीतात सुरांचा शोध अव्याहतपणे सुरु असून प्रत्येक कलाकाराची संगीतातून व्यक्त होण्याची पद्धती वेगवेगळी आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गीता धर्मपाल यांनी केले. संचालन गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. निर्मला झाला व रीती साहा यांनी केले. कार्यक्रमास संजय हांडे, दुष्यन्त जोशी, शीला पांडे, किरण सोहोळे, दिलीप चौधरी यांचेसह मु. जे. महाविद्यालय, जी. डी. बेंडाळे महाविद्यालय, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल, विवेकानंद प्रतिष्ठान, गोदावरी संगीत महाविद्यालय, स्वराध्याय, आराध्य व स्वरम संगीत संस्थांचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम