संजय राऊत यांचा आरोप : माझ्यावर हल्ला करण्याचा कट!
दै. बातमीदार । २९ नोव्हेबर २०२२ । राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपच्या कर्नाटक सरकारवर गंभीर आरोप केला आहे ते म्हणाले कि, बेळगावमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा कट आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. तसेच, कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालावे. अन्यथा रक्तपात होईल, असा इशाराही राऊतांनी दिला. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा सीमा वादावरून कर्नाटक सरकार तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली.
संजय राऊत म्हणाले, कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरून जो वाद निर्माण केला जात आहे, त्याची क्रोनोलॉजी तुम्ही समजून घ्या. 2018मध्ये बेळगावमध्ये केलेल्या एका भाषणावरून बेळगाव कोर्टाने मला आता समन्स बजावले आहे. आजच सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी चालू असूनही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगलीतील काही गावांवर दावा करून अचानक वाद निर्माण केला आहे. कर्नाटकमधील निवडणुकीचा याच्याशी संबंध आहे.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील इतर मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी आणि कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने हा डाव रचला आहे. त्यामुळेच वातावरण आणखी तापवण्यासाठी मी बेळगावला गेलो की, माझ्यावर हल्ला होऊ शकतो. अटकही होऊ शकते. मात्र, मी घाबरणार नाही. माझीही पूर्ण तयारी आहे. मात्र, हा वाद गांभीर्याने घ्यायला हवा. माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की, त्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे. अन्यथा रक्तपात होण्याची भीती आहे.
सोमवारी सांगली जिल्ह्यातील सीमावर्ती गाव उमराणीमध्ये कन्नड वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचा ध्वज फडकावला. यावर संजय राऊत म्हणाले, कन्नड वेदिकेच्या लोकांना कर्नाटक सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय ते असे धाडस करू शकत नाही. तसेच, राज्यातील काही जणांची फूस असल्याशिवाय ते महाराष्ट्रात येऊन झेंडा फडकवू शकत नाही. या लोकांना महाराष्ट्र सरकारचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मौन बाळगण्याऐवजी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊतांनी केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम