ऊर्जा खात्यात २० हजार कोटींचा घोटाळा : आ.खडसे !
बातमीदार | ४ नोव्हेबर २०२३
राज्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये राज्य सरकारविरूध्द प्रचंड रोष आहे. यात सर्वाधिक संताप आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरूध्द फडणवीसांनी विविध समाजाला अनेक आश्वासने दिली. मात्र ती पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबतही फडणवीसांनी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या ऊर्जा खात्यात २० हजार कोटींचा घोटाळा असून येत्या अधिवेशनात मी जाब विचारणार असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आज एका बैठकीत केला. दरम्यान भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखिल वैद्यकीय खात्याच्या माध्यमातून सीट्स वाढविण्यासाठी ५०-५० लाख रूपये घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हा बैठक जळगाव येथे पार पडली. यावेळी आ. एकनाथ खडसे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आ. खडसे म्हणाले की, मी कधीही हवेत आरोप करीत नाही. पुरावे असल्यानंतरच आरोप करतो. विधानसभेतही कागद हातात ठेऊन आरोप आत्तापर्यंत केले आहे आणि अनेक आरोपात तथ्य देखिल आढळून आले आहे.
देवेंद्र फडणवीसांच्याही ऊर्जा खात्यात २० हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. तर दुसरे मंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय खाते असतांना मेडीकलच्या सीट्स वाढवून देण्यासाठी लाखो रूपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे कोळी समाजाचे शिष्टमंडळ गेले होते. त्यावेळी गिरीश महाजन यांनी तुम्हाला तर तुरूंगात टाकायला हवे अशी अपमानास्पद वागणुक दिल्याची क्लिप सोशल मीडियात फिरत असल्याचा दावा आ. खडसेंनी केला
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम