…तर ५०० रुपयात मिळणार गॅस सिलिंडर !
भाजपच्या जाहीरनाम्यातून आश्वासनांचा पाऊस
बातमीदार | ४ नोव्हेबर २०२३
छत्तीसगडमध्ये महिला व भूमिहीन शेतमजुरांना वार्षिक १०,००० रुपयांची आर्थिक मदत करणे, ३१०० रुपये प्रति क्विंटल दराने भातखरेदी करणे, दोन वर्षांत १ लाख रिक्त जागा भरणे आणि गरीब कुटुंबांना अवघ्या ५०० रुपयांत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर देण्याची ग्वाही भाजपने शुक्रवारी दिली आहे. आमच्या पक्षाच्या १५ वर्षांच्या राजवटीत छत्तीसगडच्या माथ्यावरील ‘बिमारू’ शिक्का पुसून टाकल्याचा दावा भाजपने केला.
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘मोदींची हमी -२०२३’ या शीर्षकाखाली भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यात अक्षरशः आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. छत्तीसगडची सत्ता पादक्रांत केल्यानंतर राज्यात येत्या दोन वर्षांत एक लाख रिक्त सरकारी पदे भरणे आणि अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिर दर्शनासाठी राज्यातील भाविकांना घेऊन जाण्याची ग्वाही भाजपने दिली. यावेळी अमित शाह म्हणाले की, निवडणुकीचा जाहीरनामा हा आमच्यासाठी ‘संकल्प पत्र’ आहे. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने २००० मध्ये छत्तीसगड राज्याची स्थापना केली. हे राज्य आमच्यामुळेच प्रगतिपथावर आहे. आता पुढील पाच वर्षांत आम्ही छत्तीसगडला पूर्णपणे विकसित राज्य बनवणार आहोत, असे वचन शाह यांनी दिले.
भाजपला सत्ता मिळाल्यास ‘कृषी उन्नती योजना’ सुरू केली जाईल. यात ३१०० रुपये क्विंटल प्रति दराने भात पीक खरेदी केले जाईल. त्याची रक्कम एकाच टप्यात देण्यात येईल. ‘महतरी वंदन’ योजनेत विवाहित महिलांना दरवर्षी १२ हजार रुपयांची आर्थिक मदत करणे, दीनदयाल उपाध्याय कृषी मजूर योजनेत भूमिहीन शेतमजुरांना दरवर्षी १० हजार रुपये, विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्याकरिता मासिक प्रवास भत्ता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १८ लाख घरांच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला जाईल. ‘घर घर निर्मल जल अभियान’ अंतर्गत प्रत्येक घरात दोन वर्षात नळजोडणी दिली जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, ९० सदस्यीय छत्तीसगड विधानसभेसाठी ७ व १७ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम