
दै. बातमीदार । १२ ऑक्टोबर २०२२ । माजी मंत्री छगन भुजबळ १५ ऑक्टोबर रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. यानिमित्त गुरुवारी (१३ ऑक्टोबर) रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन षण्मुखानंद सभागृहात होत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रण नाकारले आहे. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहत असल्याने त्यांनी हे निमत्रण टाळले असावे अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमृतमहोत्सवी सोहळा पार पडणार आहे. सोबत सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती छगन भुजबळ गौरव समितीचे निमंत्रक प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना दिली. या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान आणि विजय सावंत लिखित छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसंच भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ७५ निवडक छायाचित्र पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याशिवाय अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे, अशीही माहिती आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस जोडीनं हे निमंत्रण राजकीय कारणांमुळे नाकारलं आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. सध्या शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट वाद, ठाकरे गटाचे भाजप आणि भाजपमधील नेत्यांशी असलेले वाद, भाजप-शिंदेंचे ठाकरे-राष्ट्रवादीशी ताणलेले संबंध तसंच याच कार्यक्रमाला उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याने शिंदे-फडणवीस यांनी त्यांच्या समोर येण्यासाठी हे निमंत्रण नाकारलं का? असे अनेक सवाल उपस्थित होतं आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम