शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाचा हवेत गोळीबार ; नाशिकमध्ये वातावरण तापल !
दै. बातमीदार । २० जानेवारी २०२३ । राज्यातील ठाकरे व शिंदे गटात सुरु असलेला वाद आता नाशकात नेते व कार्यकर्त्यामध्ये पाहायला मिळाला आहे. नाशिक शहरातील देवळाली परिसरात गुरुवारी सायंकाळी शिंदे आणि ठाकरे गटात बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर शिंदे गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
देवळाली गावात आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे, नियोजन आदींबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ, राजकीय पक्षांचे पदाधिकारी अशा सर्वांची याठिकाणी उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षपदावरुन चर्चा सुरु असताना शिंदे आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाला. आणि या वादाचे पुढे गोळीबारात रुपांतर झाले. वाद होताच स्वप्निल सूर्यकांत लवटे याने हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज येताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही अघटीत घडू नये यासाठी भीतीपोटी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली होती. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ट पोलिस फौजफाट्यासह गावात दाखल झाले. आणि स्वप्निल लवटे याला ताब्यात घेण्यात आले.
उपनगर पोलिस ठाण्यात स्वप्निल लवटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल लवटे हा शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या आहे. डिसेंबर 2022 मध्ये माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्यासह नाशिकमधील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. संजय राऊत नाशिक दौऱ्यावरुन परत येताच या नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. याआधीही शिंदे गटावर गोळीबाराचा आरोप लावण्यात आलेला आहे. मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाली होती. त्याचवेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम