शिंदे गटाचे आ.शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका
दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ । शिंदे गटाचे प्रमुख आ.संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात आले आहे. शिरसाट यांना आज सकाळी एअर अॅम्बुलन्सने मुंबईला रवाना करण्यात आले आहे. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांची लीलावतीमध्ये भेट घेणार असल्याची माहिती आहे.
गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात शिरसाट यांची तपासणी करण्यात आली. तपासणीतून संजय शिरसाट यांना यापूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. तसेच, शिरसाट यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांनी शिरसाट यांची अँजिओग्राफी केली.
शिरसाट यांच्या स्वीय सहायकाने सांगितले की, अँजिओग्राफीनंतर संजय शिरसाट यांनी मुंबईत उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आज सकाळी एअर अॅम्बुलन्सने त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले. मुंबईतील लिलावती रुग्णालयात संजय शिरसाट यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. तसेच, संजय शिरसाट यांची तब्येत आता बरी आहे. केवळ काळजी म्हणून त्यांना मुंबईला हलवण्यात आले, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर संजय शिरसाट प्रकाशझोतात आले. उद्धव ठाकरेंवर सातत्याने बोचऱ्या शब्दांत टीका करणे तसेच मंत्रिपदावरून उघड उघड नाराजी व्यक्त करण्यावरून ते कायम चर्चेत असतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम