शिंदेंची नवी रणनिती : ठाकरेंच्या संघटनेला पडणार खिंडार !
दै. बातमीदार । १९ फेब्रुवारी २०२३ । शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर खरं आव्हान समोर आलं आहे. आता सोबत असणारे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी यांना आपल्यासोबत टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर आहे. कारण शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने ठाकरे गटातील शिवसैनिकही खरी शिवसेना कोणाची या संभ्रमात पडले असून याचाच फायदा घेत त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गटाने मोठी रणनीती आखली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधीही आणि नंतरही शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटातील मुंबई, ठाणे आणि इतर महापालिकांमधील नगरसेवक व काही महत्त्वाचे पदाधिकारीही नव्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांची पुढील रणनीतीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेला आणखी मोठे खिंडार पडणार असल्याचे दिसून येत आहे. तर उद्धव यांना असलेली जनतेतील सहानुभूती काही कामासच येणार नाही असे शिंदे गटाचे नेते प्रतिक्रिया देताना म्हणतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम