शिवसेनेच्या एकाही आमदाराला पराभूत होवू देणार नाही ; मुख्यमंत्री शिंदे !
दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ । राज्यातील भाजप व शिवसेनेच्या सत्तेत राष्ट्रवादी देखील सहभागी होवून सत्तेत तिसरा वाटा निर्माण झाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी वाढली असतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी एक विधान केले आहे. त्यामुळे नाराज आमदारांना बळ मिळणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत 152 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यामुळे भाजपच्या शिवसेना व राष्ट्रवादी या मित्रपक्षांना किती जागा मिळणार? याविषयी साशंकता निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेतील बंडावेळी आपल्यासोबत आलेल्या 50 पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नसल्याचा दावा केला. सत्ताधारी पक्ष विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढवणार आहेत. मी माझ्या पहिल्याच भाषणात हे 50 आमदार 200 आमदारांचा टप्पा ओलांडणार असल्याचे सांगितले होते. तसेच माझ्यासोबत असणाऱ्या एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नसल्याचा निर्धारही व्यक्त केला होता. त्याचा पुनरुच्चार मी आताही करतो. मी माझ्या एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही, असे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारसोबत का घेतले? या प्रश्नाचेही उत्तर दिले. ते म्हणाले की, राजकारणात काही बेरजेची गणिते असतात. त्यासाठी नव्या मित्रांची गरज असते. पण यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री असून, माझ्यामागे 200 हून अधिक आमदारांचे पाठबळ आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम