“…तेव्हापासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दै. बातमीदार । १२ मे २०२४ । ‘युतीचे सरकार निवडून आले तेव्हापासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती,’ असा गौप्यस्फोटवजा आरोप करत हे पद त्यांना खरोखरच लोकहितासाठी हवे होते का? असा प्रश्न भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. प्रचारादरम्यान उध्दवजी वैयक्तिक टीका करणारी जी भाषा वापरतात ती कीव करण्यासारखी आहे.
महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी सभा घेणे, व्यूहरचना आखणे अशी महत्त्वाची कामे त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीतील मुद्दे कोणते? ठाकरे, पवारांना लाभणारा प्रतिसाद आणि देश मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल का? अशा विषयांवर त्यांनी ‘बातमीदार’शी सविस्तर बातचीत केली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या मुलाखतीतील ही निवडक प्रश्नोत्तरे.
प्रश्न – महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत राजकीय पक्षांनी आपापल्या सोयीनुसार केलेल्या राजकारणावर निवडणूक केंद्रित झालेली दिसते. ‘गद्दार’, ‘खंजीर’, ‘खोकी’ अशा शब्दांभोवती निवडणूक फिरते आहे.
”…….कडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले…
देवेंद्र फडणवीस – नाही.. तसे अजिबात नाही. यासाठी राजकीय चर्चा, पोलिटिकल डिस्कोर्स हा शब्द अधिक चपखलपणे लागू होतो. याचा कुणाच्याही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेशी संबंध नाही. महाराष्ट्रातील निवडणुकीत मोदींच्या कार्यकाळात झालेला विकास हाच मुख्य विषय आहे. उंचावलेले जीवनमान, आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताला मिळालेले यश हे निवडणुकीचे विषय आहेत. विकासयोजनांसाठी महायुतीला कौल मिळणार आहे.
मतदान विकासासाठी होणार आहे. कुणाच्या महत्त्वाकांक्षा का? आणि कशासाठी वाढल्या? हे जनता जाणते. त्यात जनतेच्या इच्छाआकांक्षांचे प्रतिबिंब कधीच नव्हते त्यामुळे माध्यमात कोणतीही चर्चा सुरू असली तरी विकास या एकाच विषयावर जनता मतदान करेल. मुंबई भोवतालच्या परिसरात तसेच गावागावात अवघ्या महाराष्ट्रात कित्येक वर्षांत झाले नव्हते तेवढे काम २०१४ पासून सुरू झाले आहे. त्यासाठीच जनता मत देणार आहे. महाराष्ट्रातील निवडणूक ही उद्धव ठाकरेंच्या केविलवाण्या वक्तव्यांभोवती फिरत नाही.
उद्धव ठाकरेंबद्दल प्रचंड सहानुभूती आहे अन् ती मोदीपर्वाला मागे टाकतेय असे म्हणताहेत.
– सहानुभूती? ती काम करणाऱ्यांबद्दल असते. आजवर ठाकरेंनी काय काम केले? काँग्रेसचा इतिहास सर्वज्ञात आहे .अन् पवारसाहेब ते तर स्वत:च सांगतात की त्यांनी पाच चिन्हांवर निवडणुका लढविल्या आहेत. वसंतदादांना झुगारून ‘पुलोद’चा प्रयोग केला तेव्हा आमच्या जनसंघाची मदत घेतली. आज अजितदादा पवारांना लक्ष्य केले जातेय पण तेव्हा स्वत: साहेब आले होते आमच्या विचारधारेसमवेत.
तब्बल पाचवेळा चिन्ह बदलले. दरवेळी नवे काही करायचा प्रकार केला. एका भूमिकेत यश मिळत नाही हे लक्षात येताच आणखी नवी भूमिका. नवा प्रयत्न. बारामतीच्या मतदानानंतर निकाल अपेक्षेप्रमाणे लागणार नाहीत हे लक्षात येताच नवी चर्चा. कॉँग्रेसमध्ये छोट्या पक्षांचे विलीनीकरण ही नवी चर्चा सुरु केली. त्यांचे कायम असेच असते.
पण उद्धव ठाकरे तर तुमच्या भाजपसमवेत असायचे. तुम्ही त्यांना ओळखू शकला नाहीत का?
– झाले खरे तसे. ते आमच्यासाठी वंदनीय असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र होते. काही गोष्टी लक्षात आल्या तरी आम्ही बोलायचो नाही. ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी श्रद्धेपोटी तसे वागायचो. खरे तर उध्दवजींना तर युतीची सत्ता आल्यानंतर १९९९ पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली होती. १९९९ च्या निवडणूक निकालांनंतर त्यांचे नाव पुढे येईना मुख्यमंत्रिपदासाठी म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली. तसे पाहिले तर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही पण त्यामागचा हेतू काय हे सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे असते. उद्धवजींना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचे वाटत असावे असे वाटते.एक उदाहरण देतो माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातले. कोस्टल रोड हा ‘एमएमआरडीए’ किंवा ‘सिडको’कडून बांधला जावा त्यामुळे वेगाने काम होईल असे मी म्हणालो. उद्धवजी तसे म्हणाले नाही. महापालिका करेल. ते कशासाठी हे जनता जाणते.
ते भाजपला सोडून वेगळी आघाडी करतील असा संशय कधीच आला नाही?
– आम्ही वैचारिक निष्ठांना सर्वाधिक महत्त्व देतो. उध्दवजी काँग्रेससमवेत जातील असे कधीच वाटले नाही.मनापासून सांगतो. बाळासाहेबांचे चिरंजीव कसे वागू शकतात यावर आमचा विश्वास होता. आमची चूक झाली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीस एकत्रपणे सामोरे जाऊ नये असे भाजपला वाटत होते?
– हो खरे आहे पण मोदीजींसह काहींना बाळासाहेबांच्या चिरंजिवाशी असे वागणे अयोग्य वाटले. माझ्यासह बहुतेकांचेही तेच मत होते. आमच्यात हिंदुत्वाचे बंध होते. त्या भावनांचा आदर करत आम्ही युती केली. काही जागांबद्दलचे त्यांचे आग्रह मान्य करून.
नंतर जे झाले तो इतिहास आहे. तो सतत चर्चेत असतोच. आता त्यापुढे जाऊ .अडीच वर्षांचा शब्द दिला नाही पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलेत ना तुम्ही. ते शिवसेनेचेच होते. ते ही तुम्ही संख्येने १०५ असताना.
– होय… मोदीजींनी घेतलेला निर्णय होता तो. ती आदरांजली होती बाळासाहेबांना असे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकाला संधी द्यायला आपण तयार आहोत हे जगाला सांगावे असे मला वाटले. हा विषय मांडताच मोदीजींनी त्यांनाही तसे वाटते असे सांगितले. शिंदे मग मुख्यमंत्री झाले. ती जबाबदारी ते समर्थपणे निभावताहेत.
यात भाजपचे शिवाय तुमचे व्यक्तिगत नुकसान झाले असे मानणारा मोठा वर्ग आहे? खासकरून तुमच्या कार्यकर्त्यांनाही तसे वाटते.
– सत्ता आणूनही मुख्यमंत्री झालो नाही याचा मलाही धक्का बसला होता. अर्थात एखादा दिवस. नंतर लगेच मी विरोधी पक्षनेता या नात्याने काम करू लागलो. संकटे येत असतात.ते आव्हान असते . पुढे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबतचा निर्णय घेण्यात माझा महत्त्वाचा सहभाग होता. पक्षकार्यकर्ता म्हणून मी ते केले.
लोकसभेच्या जागावाटपातही अन्याय झाला तुमच्या पक्षावर?
– आमचा ३० जागा लढाव्यात असा आग्रह होता .प्रयत्नही केला तसा पण शिवसेनेलाही इच्छा होती जास्त जागा लढण्याची. हरकत नाही. आमच्याही जागा वाढल्याच .आता प्रत्येक उमेदवाराला आम्ही मदत करतो आहोत.आम्ही सगळे एक आहोत.
अजितदादांना समवेत घ्यायची काय गरज होती? त्यात काय फायदा झाला? त्यांना भाजपने स्वीकारलेलेच नाही अजून.
– अजितदादा मोदीजींच्या विकासकामाला पाठिंबा देण्यासाठी आमदारांना घेऊन सोबत आले. पुन्हा एकदा तुम्ही प्रश्न विचारण्याआधी सांगतो की त्यांच्यावरच्या आरोपांमुळे ते आले नाही. त्यांचे दोषसिध्दही झालेले नाहीत. २०१३ साली मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आरोप केले होते. आरोपांची चौकशी झाली की खरे कळते . भाजपप्रदेशाध्यक्ष म्हणून तशी मागणी केली होती मी. त्या भूमिकेतून ती योग्य होती. बाकी भाजपने त्यांना स्वीकारले का? विचाराल तर बारामतीच्या लढाईत दादांना त्यांच्या कुटुंबाने एकटे पाडले. ते अभिमन्यूसारखे एकटे लढले. आमच्या लोकांना भाजपला त्या लढ्याचे अप्रूप वाटतेय. शिवाय अन्य पक्षांचे सरकार होते तेव्हा का पाठीशी घातले गेले?
राज्यात मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाचा सत्ताधारी युतीला फटका बसेल का?
– नाही वाटत तसे.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही घेतलेल्या निर्णयांची जाण या समाजाला आहे.ते आम्हालाच मते देतील.
मराठा समाज सोबत येत असेल तर ओबीसींचे काय? ते दूर जातील का?
– नाही तर.ओबीसींचा आमच्यावर वर्षानुवर्षे विश्वास आहे. तो ढळणार नाही.
दलित मुस्लिम मतदार भाजपच्या विरोधात असल्याचे बोलले जाते.
– राष्ट्रवादी मुस्लिम समाजाला भाजपबद्दल आस्था आहे. ‘सबका विकास’ मध्ये तेही आहेत. दलितांना तर अकारण भाजपविरोधक मानले जाते. सर्वाधिक दलित खासदार भाजपचेच आहेत. पुढेही राहतील.
पहिल्या काही टप्प्यानंतर मोदींना निवडणूक जड जाऊ लागली आहे का?
– तसे चित्र काही विशिष्ट हितसंबंध असलेल्यांनी तयार केले आहे.
पण मोदीजी आता चारशे पारचा उल्लेख करत नाहीयेत.
– घटना बदलण्याची हाकाटी केली जाते ना मग. म्हणून टाळले जाते ते.
राज ठाकरेंना समवेत घ्यायची काय गरज होती? ठाकरे आवश्यक वाटतात का भाजपला?
– राज ठाकरे हे राजकारण्यांच्या वर्तमानपिढीत प्रभावी नरेटिव्ह देवू शकणाऱ्या प्रमुख नेत्यातले एक आहेत.हिंदुत्व या मुद्द्यावर ते परत स्थिरावले आहेत. अशा ठाकरेंचे स्वागत आहे. या वेळी लोकसभेत त्यांना जागा देवू शकलो नाही.कारण आम्ही तिघे पक्ष एकत्र होतो. जागा केवळ ४८.आता विधानसभेत बघू.
भाजपला युती करायचीच असते का? कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची आस लागली आहे.
– स्वबळाचा नारा प्रत्यक्षात आणणे योग्य असतेच पण २०२४ची निवडणूक एकत्रितच लढली जाणार आहे. युतीतल्या आजच्या सहकाऱ्यांसह
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम