‘सुभेदार’ ने अवघ्या पाच दिवसात दिली टक्कर !
बातमीदार | ३० ऑगस्ट २०२३ | सध्या काही दिवसापासून प्रत्येक चित्रपटगृहात ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ या दोन बॉलिवूड चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू असून या दोन्ही चित्रपटानी जोरदार कमाई देखील केली आहे. पण आता या चित्रपटाच्या शर्यतीत मराठमोळा चित्रपट असलेल्या ‘सुभेदार’ सुद्धा आलेला आहे.
२५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने गेल्या पाच दिवसांत कोट्यवधींची कमाई केली आहे. मोजके शोज आणि बॉलिवूड चित्रपटांकडून तगडी टक्कर असतानाही ‘सुभेदार’ने केलेली कमाई कौतुकास्पद आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात कलाकारांची मौठी फौज आहे. यामध्ये अजय पूरकरने तान्हाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात स्मिता शेवाळे, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘सुभेदार’ने आतापर्यंत जवळपास 6.48 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. तर रविवार कमाईचा आकडा 2 कोटींवर पोहोचला.
सुभेदारची आतापर्यंतची कमाई
शुक्रवार- 1.15 कोटी रुपये
शनिवार- 1.69 कोटी रुपये
रविवार- 2.22 कोटी रुपये
सोमवार- 0.72 कोटी रुपये
मंगळवार- 0.70 कोटी रुपये
एकूण- 6.48 कोटी रुपये
केवळ कमाईच्या बाबतीत नाही तर IMDb रेटिंगच्या बाबतही या चित्रपटाने बाजी मारली आहे. IMDb रेटिंगच्या शर्यतीत दिग्पालच्या ‘सुभेदार’ने अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ला मागे टाकलं आहे. अजय देवगणच्या चित्रपटाला 7.5 IMDb रेटिंग आहे. तर ‘सुभेदार’ला 9.7 रेटिंग मिळाली आहे. अजयचा ‘तान्हाजी’ हा चित्रपटसुद्धा तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारित होता. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम