सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर’ने रचला विक्रम !
बातमीदार | १२ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही महिन्यापासून सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ या सिनेमा मोठ्या चर्चेत आला असून नुकताच १० ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित देखील झाला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. रजनीकांतचा मोठा चाहतावर्ग असून ते त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता सिनेमा प्रदर्शित झाल्याने त्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली आहेत.
‘जेलर’ या सिनेमात रजनीकांत पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिल्याने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रजनीकांतचा ‘जेलर’ हा सिनेमा यावर्षातील सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,’जेलर’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात 44.50 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळेच लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील होईल.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘जेलर’ हा सिनेमा 2023 मधला तामिळनाडूमधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. तामिळमध्ये या सिनेमाने 23 कोटींची कमाई केली आहे. कर्नाटकातही या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. ‘आदिपुरुष’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 2023 मध्ये ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई केली. या सिनेमाने 89 कोटींचा व्यवसाय केला. यानंतर या यादीत शाहरुख खानच्या पठाणचा समावेश आहे. आता या यादीत रजनीकांतच्या ‘जेलर’चाही समावेश झाला आहे.
रजनीकांतचा बहुप्रतिक्षित ‘जेलर’ सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि सिनेप्रेमींनी सिनेमागृहात गर्दी केली होती. त्यामुळे मॉर्निंग शोमध्येही रजनीकांतचा जलवा पाहायला मिळाला. तर दुसरीकडे अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने 18 कोटींची कमाई केली होती.
नेल्सन दिलीपकुमारने ‘जेलर’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा सध्या जगभरात बोलबाला आहे. सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. जेलर हा रजनिकांत यांचा 169 वा चित्रपट आहे. अॅक्शनचा तडका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम