मानवी प्रगतीसाठी शाश्वत विकास महत्त्वाचा – मुख्याधिकारी लांडे
भडगाव/प्रतिनिधी
मानवी जीवन अधिक समृद्ध आणि सुकर करण्यासाठी शाश्वत विकास होणे फार आवश्यक आहे. त्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा मानवाने विचारपूर्वक वापर करायला हवा. येणाऱ्या अनेक पिढ्यांना या संसाधनांची गरज पडणार आहे. त्यामुळे ती दीर्घकाळ टिकतील, याची काळजी घ्यायला हवी, असे प्रतिपादन भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी केले. सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वडगाव बुद्रुक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. कचरा साफ करणे म्हणजे स्वच्छता नव्हे तर कचरा होऊच देऊ नये याला स्वच्छता म्हणावे. म्हणून प्रत्येक जबाबदार नागरिकाने स्वच्छतेची सवय आपल्या कुटुंबात रुजवायला हवी, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश भंगाळे होते. यावेळी ‘वित्तीय साक्षरता’ या विषयावर डॉ. बी. एस. भालेराव यांनीही स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. जीवन जगताना आर्थिक नियोजन कसे करावे? उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ कसा लावावा? मानवी आयुष्यात बचतीला किती महत्त्व आहे? त्याचप्रमाणे गुंतवणुकीचे विविध पर्याय अशा वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एन. व्ही. चिमणकर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कु.भाग्यश्री जाधव हिने केले. कार्यक्रमाला डॉ. दिनेश तांदळे, डॉ. अतुल देशमुख, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. ए. मस्की, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.एम. गजभिये, प्रा. ज्योती नन्नवरे यांची उपस्थिती होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम