‘त्या’ हल्ल्यामागे ठाकरे व राऊत यांचा हात ; मनसे नेत्याचा आरोप !
दै. बातमीदार । ३ मार्च २०२३ । आज सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर एका टोळक्याने हल्ला केला. त्यांनी स्टम्पच्या साहाय्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना मारहाण केली. त्यामध्ये संदीप देशपांडे यांचा हात फ्रॅक्चर झाला. या हल्ल्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
या सगळ्या घडामोडींनंतर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी एक गंभीर आरोप केला आहे. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी अमेय खोपकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये जर काही तथ्य निघालं तर त्यांना अटक करण्यात यावी, असेही खोपकर यांनी म्हटले.
संदीप देशपांडे हे मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. याच कारणामुळे त्यांच्यावर हल्ला झाला असण्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे गप्प बसणारा माणूस नाही. मुंबई पोलीस आणि प्रशासनाने संदीप देशपांडे यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी. पण त्यापूर्वी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी. हल्ल्याच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचे आढळले तर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना अटक करावी, असेही खोपकर यांनी सांगितले.
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली होती. आज सकाळपासून त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत होते. यादरम्यानच्या काळात हिंदुजा रुग्णालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच संदीप देशपांडे यांना भेटण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात नेत्यांची रीघ लागली होती. हल्ल्याची बातमी समजताच मनसेचे स्थानिक नेते तातडीने हिंदुजा रुग्णालयात गेले. यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरेही रुग्णालयात आले, त्यांनी संदीप देशपांडे यांची विचारपूस केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम