ठाकरे बंधू एकत्र येणार ? ठाकरेंनी बोलविली बैठक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जुलै २०२३ ।  राज्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेनंतर पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे बंड झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केली. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. या महाभुंकपानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे सर्व आमदार-खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बैठकीत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी बातचीत करुन महाविकास आघाडीत राहायचं की एकला चलो रेची भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर “उद्धव ठाकरे यांनी आता ‘सत्तांतर करो’, ‘एकला चलो’चा नारा देऊन लोकांमध्ये जायला पाहिजे अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे.” असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या बंडानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केले. मात्र यावर राज ठाकरेंनी भाष्य केले नाही. याशिवाय मनसे कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे बॅनर लावण्यात आले होते. यात “महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला. राजसाहेब – उद्धवसाहेब आता तरी एकत्र या.संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे” असा मजकूर लिहीलेला होता. यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम