राज्यात थंडीचा तडाखा वाढला; जाणून घ्या आपले शहर किती अंशावर?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ नोव्हेबर २०२२ राज्यात गेल्या काही दिवसापासून बोचरी थंडी होती मात्र कालपासून उत्तर भारतातील हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी वाढली असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले आहे. महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या (१०.६) तुलनेत औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगावात तर पारा जास्तच खाली आला आहे. नाशिक जिल्ह्यात आेझर येथे रविवारी सर्वात कमी म्हणजे ६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. हवामानतज्ज्ञांच्या मते पुढील १०-१२ दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.

राज्यात यंदा पंधरा दिवस थंडीचे अगोदर आगमन झाले. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी गायब झाली होती. मात्र जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, लडाखमध्ये बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांनी गुजरात, महाराष्ट्रातील किमान तापमान घसरले आहे. सातारा जिल्ह्यात थंडी वाढली असून महाबळेश्वर-पाचगणी येथे पारा घसरला आहे.

वेण्णालेक परिसरात रविवारी सकाळी तापमान एकदम घटले. सकाळी थंडी, दिवसभर निसर्गाचा आनंद व रात्री उशिरापर्यंत पर्यटकांनी बाजारात खरेदीचा आनंद लुटला. डिसेंबर महिन्यात पाचगणी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच त्या परिसरातच समुद्रसपाटीपासून साडेसात किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. वायव्येकडे सरकणारी ही प्रणाली किनाऱ्याकडे अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील राज्यात पाऊस पडेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम