चेहऱ्यावरचा रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही ; ठाकरेंचा टोला !
दै. बातमीदार । २५ जून २०२३ । राज्यामध्ये नुकतेचे काही दिवसापूर्वी ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले. या पार्श्वभूमीवर, मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्कमपणे सोबत आहोत, शिवसेना-भाजपची युती आगामी सर्व निवडणुका जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. परंतु मिंधे गटाची फुकाची जाहिरातबाजी म्हणजे वरवरची रंगसफेदी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही,’ असं म्हणत ठाकरे गटानं एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.
‘शिवसेनाप्रमुखांबाबतचे यांचे प्रेम व आदर म्हणजे निव्वळ ढोंग होते हे कालच्या जाहिरातबाजीने स्पष्ट केले, पण जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का? आतापर्यंत आपण सगळ्यांनी खूप कल्पक जाहिराती पाहिल्या असतील, पण अशी जाहिरात होणे नाही!’ असं म्हणत ठाकरे गटाने सामनाच्या संपादकीयमधून निशाणा साधलाय. आतापर्यंत या बेकायदा सरकारने असंख्य जाहिराती दिल्या, पण काल मिंधे गटातर्फे प्रसिद्ध झालेल्या एका पूर्ण पान जाहिरातीने फडणवीसांसह त्यांच्या 105 आमदारांच्या काळजाचे पाणी पाणीच झाले आहे. सर्वच वृत्तपत्रांत कोटय़वधी रुपये खर्च करून अगदी पहिल्या पानावर ‘मोदी-शिंद्यां’च्या फोटोसह जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्या जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस गायब आहेत. ही जाहिरात सरकारी नसून चोरलेल्या बनावट शिवसेनेची आहे, असे म्हणत संपादकीयमधून टीका करण्यात आलीये.
‘जाहिरातीत पंतप्रधान मोदी यांचा फोटो खुबीने वापरला, पण फडणवीस कोठेच नाहीत. जाहिरात सरकारी नसल्यामुळेच फडणवीसांवर फुली मारली असा त्यावर खुलासा असेल, तो तितकासा खरा नाही; पण ‘आम्हीच खरी शिवसेना व आम्हीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार’ असे ढोल पिटणाऱ्यांच्या या जाहिरातीत मोदी आहेत, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदेखील पूर्णपणे गायब आहेत. यावर भाजप व शिंदे गटाच्या टिल्ल्या-चिल्ल्या टिनपाट प्रवक्त्यांचे काय म्हणणे आहे? एकाच वेळी फडणवीस यांना धक्का देणाऱ्या व शिवसेनाप्रमुखांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जाहिरातींचे प्रयोजन काय? प्रश्न एका जाहिरातीचा नाही, तर स्वतःस शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांनी त्यांचा गट मोदींच्या पायाशी लीन करून ठेवला हा आहे,’ असं यात नमूद करण्यात आलेय.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम