
नगरसेवकांना कोट्यवधींचा निधी प्राप्त; लागणार विकासकामांची “जत्रा”
दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । राज्यात शिंदे-भाजप युती असलेले सरकार सत्तेत आल्यापासून जळगाव शहर महानगरपालिकेतील राजकारणाचेही चित्र बदलत असून, शिंदे गटातील नगरसेवकांनाही कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सभागृह नेते ललित कोल्हे, चेतन सकट, दिलीप पोकळे यांच्यासह काही प्रमुख नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांसाठी ११ कोटींचा निधी उपलब्ध केला गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सर्व विकासकामे करण्यात येणार असून, या प्रस्तावावर महापालिका सभागृहात रविवार (दि.७) ऑक्टोबर रोजी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष महासभेत प्रशासकीय मान्यता घेण्यात येईल.
महासभेतील प्रस्तावांची रुपरेषा :-
◆ शहरातील वेगवेगळ्या पाच ठिकाणची विकास कामे शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार.
◆ घरकुलधारकांना अमृत योजना देण्यासाठी धोरण निश्चित केले जाणार.
◆ शासनाने दिलेल्या २० कोटींच्या अनुदानातून शिल्लक ५ कोटी रुपयांद्वारे शहरातील विविध ठिकाणी शौचालय बांधण्यात येणार.
◆ शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी ३१ लाखांच्या खर्चाची तरतूद.
दरम्यान, विरोधी पक्ष नेत्यांतर्फेही पर्यटन विभागाकडे शिवाजी उद्यानाच्या सुशोभिकरण व विकासासाठी दहा कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केला गेला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम