कॉंग्रेसच्या माजी आमदारांची मुलगी ठाकरे गटात घेणार प्रवेश !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ मे २०२३ ।  गेल्या काही दिवसापासून राज्यातील विरोधी पक्षाची भूमिका मांडणारे महाविकास आघाडीत धुसफूस होत असल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. यातच आता कॉंग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आणि महाडचं नगराध्यक्षपद भूषविलेल्या काँग्रेसच्या स्नेहल जगताप या आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

महाडच्या चांदे क्रीडांगणावर शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं स्नेहल जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. महाडचा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचा बालेकिल्ला असल्यानं त्यांची राजकीय कोंडी करण्याची रणनीती उद्धव ठाकरे गटाकडून सुरू आहे. महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याचे संकेतही मिळत आहेत.

अनेक वर्षे काँग्रेस पक्षासोबत असलेल्या स्नेहल यांचा ठाकरे गटातील प्रवेशाच्या वृत्तामुळं राजकीय खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार माणिक जगताप यांचे भाऊ हनुमंत जगताप, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, राजेंद्र कोरपे, धनंजय देशमुख, श्रीधर सकपाळ, माजी नगरसेवक वजीर कोंडीवकर व सुदेश कळमकर उपस्थित होते. आपण घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतल्याचं स्नेहल यांनी या वेळी स्पष्ट केलं. स्नेहल यांचं नाव उद्धव ठाकरे गटाकडून आमदारकीचे उमेदवार म्हणून घेतलं जात आहे, मात्र महाविकास आघाडी करून उमेदवारी मिळाली नाही तर आपली भूमिका काय असेल अशी विचारणा केली असता, आमचा निर्णय कोणत्या स्वरूपात बदलणार नसल्याचं सुनील जगताप यांनी स्पष्ट केलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम