निविदा मंजूर करण्यासाठी अभियंत्याने घेतली ६ लाखांची लाच !
बातमीदार | २ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अनेक ठिकाणी कारवाई करीत असतांना पुन्हा एकदा नांदेडमधील सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंत्याने निविदा मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून सहा लाख रुपयांची लाच घेतली. हि रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अधीक्षक अभियंत्यासह लिपिकास ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्य माहितीनुसार, नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आणि लिपिक विनोद कंधारे यांना सहा लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री उशिरा ही कारवाई केली. बांधकाम विभागाकडून काढण्यात आलेली १४ कोटी १० लाखाच्या कामाची निविदा मंजूर करण्यासाठी गजेंद्र राजपूत यांनी कंत्राटदाराला सात लाखाची मागणी केली. तडजोडीअंती सहा लाख रूपये घेण्यास त्यांनी मान्य केले.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंडळातील लिपिक विनोद कंधारे यांच्या मार्फत सहा लाख घेतांना एसीबीच्या पथकाने दोघांना अटक केली. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्ररकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री एसीबीने गजेंद्र राजपूत यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा पथकाला ७२ लाख रूपये रोख आढळले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम