महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री ; राजकीय चर्चेला उधान !
दै. बातमीदार । २३ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील सत्तेसाठी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचा वाद संपूर्ण देश बघत असतानाच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या एकदम जवळ महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री म्हणून थेट सुप्रिया सुळे यांचे बॅनर लावण्यात आल्याने एकच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे फोटो आहेत.
विशेष म्हणजे यापूर्वी अजित पवार, जयंत पाटील यांचे बॅनरही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्या नावाने बॅनरबाजी झाल्याने या मागे कोण, असा सवाल निर्माण होत आहे. मात्र, या साऱ्या प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
काय घडल ?
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यालय आहे. या कार्यालय परिसरात महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कन्या सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा मोठा फोटो छापण्यात आला आहे. त्याखाली नाद नाय करायचा, अशी एका ओळीची कॅप्शन दिली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. हे बॅनर नंतर पोलिसांनी काढल्याचे समजते.
विशेष म्हणजे यापूर्वी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार अशी बॅनरबाजी झाली होती. एका आमदाराने तसे आवाहनही केले होते. मात्र, स्वतः अजित पवार, शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावले. या दोघांनीही मागणी काहीही होवो. मात्र, आकड्यांचे गणित महत्त्वाचे असते, असे एका वाक्यात सांगितले होते. त्यानंतर जयंत पाटील यांचेही बॅनर लावले गेले होते. त्याचीही चर्चा रंगली होती.
मुंबईत लागलेल्या बॅनरबद्दल सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली. बॅनर लावणाऱ्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसे हे पोस्टर कोणी लावले, असा सवाल केला. एका महिलेचा फोटो पोस्टवर लावायला तुम्हाला कोणी अधिकार दिला, असा सवाल त्यांनी केला. माझा फोटो, पोस्ट मला न सांगता लावले. मला पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
माझा फोटो, बॅनर लावायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा फोटो कुठल्या पक्षाने लावलाय का? कोणत्या व्यक्तीने लावलाय का? असा फोटो कोणी लावू शकतो का? जर हा फोटो असा लावला असेल, तर हा देश कायदे नियमाने चालतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी मला न्याय द्यावा.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम