‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार लाख रुपये !
बातमीदार | २३ नोव्हेबर २०२३
राज्यभरात दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला होता. या काळात एसटी महामंडळाकडून बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावर रुजू न झाल्याने बडतर्फ करण्यात आले. तर संप काळातच बहुतांश कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. साधारण ७५ ते ८० कर्मचाऱ्यांचे या काळात निधन झाले असून अशा मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ‘कर्मचारी कुटुंब कल्याण योजने’ अंतर्गत लाभ देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. प्रत्येकी एक लाख रुपये वारसांना देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पुढील तब्बल ५ महिने एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. कालांतराने तोडगा न निघाल्याने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. या प्रकरणात ७ एप्रिल २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कामगारांना २२ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर रुजू होण्याबाबत आदेश पारित केले. या काळात बहुतांश कर्मचाऱ्यांना शिस्त व अपिल कार्यपद्धती अंतर्गत महामंडळाच्या सेवेतून निलंबित / बडतर्फ करण्यात आले होते. मात्र त्या कर्मचाऱ्यापैकी निलंबन / बडतर्फीविरोधात संबंधित आवेदन प्राधिकाऱ्याकडे प्रथम आवेदन सादर करण्यापूर्वी अथवा या आवेदनावर निर्णय होण्यापूर्वी काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले. अशा कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या वारसाबाबतीत एसटी महामंडळाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये संप काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ‘कर्मचारी कुटुंब कल्याण योजने’ अंतर्गत १ लाख रुपये लाभ देण्यात येणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम