राज्यात पावसाचा जोर वाढणार ; हवामान विभागाचा अंदाज !
बातमीदार | २९ सप्टेंबर २०२३
देशभरातील अनेक राज्यात पाऊस सुरु असतांना आता राज्यातील सर्वच भागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांसोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे आणि मुंबईत विसर्जन मिरवणुकीतही पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील सिंहगड रोज परिसरात जोरदार पाऊस झाला. सलग आलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागातील ओढे, नदी, नाले भरून वाहत आहेत. तर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
आज कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पावसाने उशीरा का होईना, हजेरी लावल्याने पिण्याचा पाण्याच प्रश्न सुटण्याची आशा वाढली आहे. दुसरीकडे मात्र, पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच दुबार पेरणीमुळे त्रस्त असलेला शेतकरी हातातले पिक गेल्यामुळे आणखी अडचणीत सापडणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम