महाविकास आघाडी सरकार पटोलेंमुळेच पडले ; शिवसेनेचा दावा !
दै. बातमीदार । ९ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे नाना पटोलेंमुळेच पडले, असा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. तसेच, नाना पटोले–बाळासाहेब थोरात वाद चिघळू नये, अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली आहे. त्यावर टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये आज म्हटले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही. विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही व त्याचाच फायदा पुढे ‘खोके’बाज आमदार व त्यांच्या दिल्लीतील ‘महाशक्ती’स मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा व अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल.
पटोले व थोरात शहाणे नेतेनानासाहेब पटोले-बाळासाहेब थोरात वादावर अग्रलेखात म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज जे घडतेय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते. संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पटोले व थोरात हे शहाणे नेते आहेत. फार काय बोलावे? अग्रलेखात म्हटले आहे की, थोरातांनी सध्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. थोरातांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षाच्या उरलेल्या फांद्या हलू लागल्या आहेत. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे कठीण आहे, असे सांगून थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले विरुद्ध थोरात हा वाद बरेच दिवस खदखदत होता. त्यास आता उघड तोंड फुटले. थोरातांच्या संयमाचा बांध फुटल्यामुळे हे घडले काय? याचा विचार आता त्यांच्या हायकमांडने केला पाहिजे. थोरात हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचा खांदा एका अपघातामुळे निखळला आहे व हात गळय़ात बांधला आहे. तरी ते एकहाती मैदानात उतरून लढण्याच्या मनःस्थितीत आहेत. याचा अर्थ ते खूप दुखावले आहेत व आरपारच्या लढाईस सिद्ध आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम