मंत्री गावितांना ते वक्तव्य भोवणार ; आयोगाची नोटीस !
बातमीदार | २२ ऑगस्ट २०२३ | राज्यातील तीन चाकी सरकारमधील अनेक नेते व मंत्री सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करीत असतांना नेहमी घडत आहे. आता पुन्हा एकदा मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर झाले आहेत. तसे, मासे खाऊन तुमचेही डोळे सुंदर होतील, असं वक्तव्य विजयकुमार गावित यांनी केलं होतं. या विधानाप्रकरणी राज्य महिला आयोगाने विजयकुमार गावित यांना नोटीस बजावत तीन दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितलं आहे.
“तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? ती समुद्राच्या किनारी राहणारी, बंगळुरुच्या समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. तिचे डोळे बघितले ना? तसे तुमचेही डोळे होणार. मासे खाल्ले, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचं तेल असतं,” असं विजयकुमार गावित यांनी म्हटलं.
एका न्यूजशी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, “गावित यांनी केलेला उल्लेख महिलांचा अपमान करणारं आहे. महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार विजयकुमार गावित यांना नोटीस बजावली आहे. गावितांना उत्तर सादर करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. गावितांनी आपला खुलासा सादर करावा.”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम