बच्चू कडूंची गाडी आडवत वृद्ध बोलले ; तुम्ही गद्दारी का केली?
दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड करून राज्यातील सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. यात प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू देखील सहभागी झाले होते. तेच प्रकरण आता पुन्हा तापू लागले आहे. धाराशिव जिल्ह्यात एका वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंची गाडी आडवून त्यांच्यासमोर संताप व्यक्त केलाय. तुम्ही गद्दारी का केली? असा थेट सवाल वृद्धाने विचारला आहे. संबंधित वृद्ध व्यक्तीने गर्दीत घुसून बच्चू कडू यांना जाब विचारला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही शिंदे गटात सामील झाले. यावरून आज एका वृद्ध व्यक्तीने त्यांना चांगलेच धारेवर धरले.
व्हिडिओ मध्ये दिसत आहे की, संबंधित वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंचा हात पकडून , तुम्ही असे का वागायला लागले आहात, जरा नीट वागा. राज्यघटनेच्या चौकटीत वागा. जनतेला त्रास देऊ नका. अशा शब्दांत वृद्धाने बच्चू कडूंना जाब विचारला. यावेळी बच्चू कडू यांच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित वयोवृद्ध व्यक्तीला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वयोवृद्धाने म्हटलं, “ही गद्दारी नाही, तर गद्दारीचा बाप आहे का? यांचं वागणं नीट आहे का?” असे सवाल वयोवृद्धाने विचारलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम