
राज्यात सत्तेचा वाद कायम : शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच झटापट !
दै. बातमीदार । ६ जुलै २०२३ । राज्यात वर्षाभरापूर्वी शिवसेनेतून बंडखोरीकरून भाजपसोबत सत्तेत वाटा घेतलेल्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. तर काही नेत्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली होती. एक वर्षाने याचं मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची शिंदे गटातील आमदार वाट पाहत होते. पण राष्ट्रवादीतून बंडखोरी करून भाजप सोबत हातमिळवणी अजित पवारांनी केली असतांना हि हातमिळवणी शिंदे गटातील आमदारांच्या चांगलीच जिव्हारी आली आहे. आता जेमतेम तीन-चारच मंत्रिपदे वाट्याला येणार असल्याने शिंदे गटाच्या अस्वस्थतेचा आता स्फोट होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून मुंबईत शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये सुरुवातीला बाचाबाची व नंतर चांगलीच झटापट झाल्याची माहिती मिळत आहे.
सोमवारी अजित पवार गटाचा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सायंकाळी शिंदे गटाच्या या दोन आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर दौऱ्यावर होते. मात्र, आमदारांमधील भांडणाचे वृत्त समजताच आपला दौरा अर्धवट सोडून आमदारांमधील भांडण सोडवण्यसाठी ते तातडीने मुंबईत दाखल झाले. दरम्यान, नेमक्या कोणत्या दोन नेत्यांमध्ये भांडण झाले, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, यातील एक नेता हा छत्रपती संभाजीनगरमधील असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांचे भांडण होताच मुख्यमंत्री शिंदे आपला नागपूर दौरा सोडून तातडीने मुंबईत दाखल झाले. त्यांनी दोन्ही नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर दिवसभर मुख्यमंत्र्यांकडून नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अजितदादांनी मंत्रिपदाची भाकरीच हिरावून नेल्याची भावना काही आमदारांनी बोलून दाखवली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून मंत्रिपदाची संख्या वाढवू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या आमदारांना दिल्याचे समजते.
गेल्या वर्षभरापासून शिंदे गटाचे नेते हे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. पूर्वी सत्तेत केवळ शिंदे गट व भाजप हे दोनच वाटेकरी असल्याने समसमान मंत्रिपद मिळतील अशी आशा शिंदे गटाला होती. त्यातून शिंदे गटाच्या वाट्याला हक्काची 12-13 मंत्रिपदे मिळतील, अशी आशा शिंदे गटाला होती. त्यामुळे अनेक नेत्यांनीही आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. मात्र, आता अजितदादांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाला जेमतेम 3-4 मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्येच आपापसात चूरस वाढली आहे. याच मुद्द्यावरून दोन आमदारांमध्ये मंगळवारी सांयकाळी झटापट झाली. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित झालेल्या बैठकीतही ‘ज्यांनी आतापर्यंत मंत्रिपदे भोगली, त्यांना हटवा व आम्हाला संधी द्या’, अशी आक्रमक मागणी काही आमदारांनी केली. अखेर शिंदेंनी मंत्रिपदाची संख्या वाढवू, असे म्हणत आमदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम