दै. बातमीदार । २० एप्रिल २०२३ । देशातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मिरचीची बाजारपेठ म्हणून खान्देशातील नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची खरेदी विक्रीचा नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. मार्च अखेरपर्यंत नंदुरबार बाजार समितीत दोन लाख 17 हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात संपणारा मिरचीचा हंगाम यावर्षी एप्रिलपर्यंत लांबला आहे. यावर्षी विक्रमी अशी आवक झाली आहे. त्यासोबत मिरचीच्या दरातही दुपटीनं वाढ झाल्यानं यावर्षी मिरचीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. मिरची उत्पादनाचा नवीन विक्रम प्रस्थापित झाला असून बाजार समितीत मार्च अखेरपर्यंत दोन लाख 17 हजार क्विंटल ओल्या लाल मिरचीची खरेदी झाली आहे. एप्रिल अखेरपर्यंत हा आकडा अडीच लाख क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढत ही सर्वात मोठी आवक असल्याचं बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले. त्याच्यासोबत बाजार समितीमध्ये गेल्यावर्षी मिरचीला 2500 रुपयापर्यंत दर होते. यावर्षी लाल मिरचीला सरासरी 5100 रुपयापर्यंत दर मिळाला आहे. मिरचीचे भाव मागील वर्षापेक्षा दुपटीने वाढले असून त्यामुळं सर्वसामान्यांच्या जेवणातील महत्त्वाच्या घटक असलेला चटणीचे दरही वाढले आहेत.
मागील हंगामातील एकूण आवक ही दोन लाख पाच हजार क्विंटल झाली होती. या हंगामात मार्चअखेर ही आवक दोन लाख 17 हजार क्विंटलझाली आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात संपणारा मिरचीचा हंगाम यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सुरु आहे. पोषक वातावरणामुळं मिरचीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मिरचीचे दर दुप्पट वाढले आहेत. गेल्या वर्षी मिरचीला 2500 रुपये क्विंटल पर्यंतचा दर होता. यावर्षी मिरचीच्या दरात दुपटीने वाढ मिरचीला सरासरी 5100 पर्यंत भाव मिळत आहे. दर वाढल्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. मिरचीचे दर वाढल्यानं चटणीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे.
यावर्षी मिरचीसाठी असलेले पोषक वातावरण आणि मिरचीला मिळणारा चांगला दर या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरल्या आहेत. त्यामुळं यावर्षी जिल्ह्यातील मिरचीच्या उत्पादन क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची उत्पादन घेतले जात असले तरी राज्य सरकारकडून मिरची प्रक्रिया उद्योग आणि मिरची संशोधन केंद्र अजूनही सुरू करण्यात आलं नाही.त्यामुळं मिरची उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अनेक अडचणी अजून सुटल्या नाहीत. मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारनं योग्य धोरण आखावं अशी मागणी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडून होत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम