कारागृह प्रशासनाने घेतला निर्णय : कैद्यांच्या पगारात होणार वाढ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० ऑगस्ट २०२३

देशात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात महागाईची तीव्रता वाढत असून आता तुरुंगातील उद्योगांमध्ये काम करत असलेल्या कैद्यांनाही पगारवाढ लागू करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाने त्याबाबत निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सात हजारांपेक्षा अधिक कैद्यांना लाभ होणार असल्याचे कारागृह विभागाने सांगितले. या पगारवाढीमुळे कारागृहातील कैद्यांना दिवसाला पाच ते दहा रुपयांची वाढ शनिवारपासून लागू झाली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये सरासरी ७ हजार कैदी काम करत असतात. यामध्ये पुरुष कैदी ६३०० आणि महिला बंदी ३०० आहेत.

दर तीन वर्षांनी वाढ
कैद्यांना दर तीन वर्षांनी दहा टक्के वाढ देण्याची तरतूद आहे. बंद्यांना पगारवाढ देण्यात यावी अशी विनंती करण्यात येत होती. त्यानुसार कारागृह व सुधारसेवा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी २० ऑगस्टपासून कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सर्व बंद्यांना पगारवाढ लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

शेतीव्यवसाय जोरात…
कारागृह शेती उद्योगामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, अन्नधान्ये उत्पादित केली जातात. शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, गाई-गुरे पालनही केले जाते.
यासाठी होतो उपयोग… या पैशांचा वापर कैदी दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृह उपाहारगृहातून खरेदी करण्यासाठी तसेच स्वतःच्या कुटुंबीयांनाही मनिऑर्डर करून करतात. तर वकिलांची फी भरण्यासाठीही यातून मदत होते.

कैदी ही कामे करतात
सुतारकाम, लोहारकाम, शिवणकाम, चर्मकला, हातमाग, यंत्रमाग, बेकरी, कागदकाम, फाउंड्री, कार वॉशिंग सेंटर, इस्त्रीकाम, गॅरेज, मूर्तिकाम.

उत्पादने
कारागृह उद्योगाद्वारे विविध कपडे, खुर्ची, टेबल, कपाट, दरवाजे, खिडक्या, शाळेसह विविध युनिफॉर्म, सौंदर्यप्रसाधने इत्यादी तयार होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम