अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या तिघांना नदीत जलसमाधी
बातमीदार | २० नोव्हेबर २०२३
चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर याठिकाणी मोठ्या वडिलांच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांच्यासह त्यांचा मुलगा आणि भाच्याचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. उशिरापर्यंत तिघांचेही मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. मृतकांमध्ये चंद्रपूर ‘कृउबास’चे उपसभापती गोविंदा पोडे, मुलगा चेतन गोविंदा पोडे आणि भाचा गणेश रवींद्र उपरे यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथील गोविंदा पोडे यांचे मोठे वडील पोडे येथील घनश्याम झित्राजी पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यांचे अस्थिविसर्जन करण्यासाठी पोडे कुटुंबीय रविवारी १९ नोव्हेंबर दुपारी २ वाजताच्या सुमारास वर्धा इरई नदीच्या संगमावर गेले. दरम्यान मुलगा व भाचा नदीच्या प्रवाहात बुडत होते. त्यांना वाचविण्यासाठी उपसभापती गोविंदा पोडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघांनाही जलसमाधी मिळाली. यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून उशिरापर्यंत चेतन गोविंदा पोडे आणि गणेश उपरे यांचा मृतदेह शोधून नदीपात्रातून बाहेर काढला. परंतु, गोविंदा पोडे यांचा मृतदेह शोधण्यासाठी उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर त्यांचाही मृतदेह सापडला. या घटनेने येथील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, नांदगाव पोडे आणि विसापूर येथे शोककळा पसरली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम