दिवाळीनंतरच होणार आमदार अपात्र प्रकरणी निकाल !
बातमीदार | ३ नोव्हेबर २०२३
गेल्या काही महिन्यापासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण जोरदार सुरु असतांना आता या प्रकरणाची पुढची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गुरुवारी पार पडली. १६ नोव्हेंबरपर्यंत संबंधित कागदपत्रे सादर करावीत, असे निर्देश नार्वेकर यांनी यावेळी दिले असून दिवाळीनंतर २१ नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ईमेलवरील व्हीपच्या युक्तिवादावरून दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या ( शिंदे ) आमदारांनी सुनावणीला दांडी मारली, तर शिवसेनेकडून (ठाकरे) खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू आणि आमदार अजय चौधरी उपस्थित होते.
शिवसेनेच्या आमदारांच्या एकूण ३४ याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण करण्यात आल्यानंतर गुरुवारी व्हीपच्या मुद्दयावर सुनावणी पार पडली. सेनेच्या ( शिंदे) १६ आमदारांना ई-मेलच्या माध्यमातून व्हिप बजावला होता, असा दावा सेनेचे (ठाकरे) वकील देवदत्त कामत यांनी केला. सेनेचे (शिंदे) वकील अनिल सिंह आणि अनिल साखरे यांनी त्यावर आक्षेप घेत आमच्या पक्षकाराला कोणताही ई-मेल मिळाला नसल्याचे सांगत दावा खोडून काढला. सेनेकडून (ठाकरे) यावेळी पुरावे सादर करण्यात आले. मात्र ई-मेल आयडीच चुकीचा आहे, असा जोरदार युक्तिवाद केला. नार्वेकर यांनी यावर ई-मेल आयडी चुकीचा असेल, तर त्याला उत्तर काय ? असा प्रश्न कामत यांना विचारला. दरम्यान, संबंधित पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याचे सांगत सेनेच्या (ठाकरे) वकिलांनी ठामपणे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूच्या वकिलांच्या युक्तिवादामुळे मोठा गदारोळ झाला. यावर फेरसाक्ष घेण्याचा तोडगा नार्वेकर यांनी काढत दिवसभराची सुनावणी थांबवली.
मर्यादित वेळेत ही सुनावणी घ्यायची आहे. दोन्ही गटांच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतोय. २५ सप्टेंबरच्या निर्णयानुसार, पुरावे सादर करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर २८ ऑक्टोबरला अर्ज दाखल केले; परंतु संबंधित अर्ज फेटाळण्यात आला असून आता व्हीपसंदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेने (शिंदे) मेल मिळालाच नाही, असे सांगितले. गेल्यावेळी मी सांगितले होते की, पुरावे सादर करावेत; पण अद्याप अर्जावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे लवकरच कागदपत्रे सादर करावीत, अशा सूचना नार्वेकर यांनी यावेळी दिल्या.
येत्या २१ नोव्हेंबर पासून अपात्रतेप्रकरणी नियमित सुनावणी पार पडेल. त्यासाठी राहुल नार्वेकर वेळापत्रक जाहीर करतील. २१ नोव्हेंबरला पहिला साक्षीदार तपासला जाईल. त्यामुळे कागदपत्रांचे पुरावे २६ तारखेपर्यंत सादर करायचे आहेत, असे शिवसेनेचे (ठाकरे) वकील देवदत्त कामत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम