
जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक पुढे ढकलला !
बातमीदार | ८ सप्टेंबर २०२३ | पाचोरा शहरात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम ९ रोजी होणार होता मात्र काही अडचणीमुळे हा दौरा आता १२ सप्टेंबर रोजी होणार आहे, असे या कार्यक्रमाचे आयोजक आमदार किशोर पाटील यांनी एका प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ रोजी मुख्यमंत्र्याचा अचानक दिल्ली दौरा ठरल्याने हा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पाहिला तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी” हा उपक्रम २६ ऑगस्ट रोजी ठरला होता. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार होता. त्यात पुन्हा एकदा बदल झाला असून आता हा कार्यक्रम १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आमदारांनी दिली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे, डॉ. तानाजी सावंत आदी मंत्री उपस्थित राहणार आहेत. शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा, यासाठी शासनाच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हानिहाय सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम