लाखो रुपये पगार सोडून तरुणाने केला हा उद्योग !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ एप्रिल २०२३ । जगभरात २०१९ मध्ये कोरोनाचे संकट आल्यावर अनेक तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागला तर काहींनी तर सोशल मिडीयाचा वापर करीत आपले उद्योग सुरु केले तर काहींनी पुन्हा एकदा शेतीकडे वळत आदर्श तरुणासमोर ठेवला तशीच काही घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातल्या लक्ष्मणगढ इथल्या निजामनगर गावात राहणाऱ्या रघुराज या तरुण इंजिनीअरने शेतीची वाट धरली आहे. त्याने लाखो रुपयांची नोकरी सोडून सेंद्रिय शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे रघुराजला शेतीमध्ये यशही मिळालं आहे. त्याने शेतीत पिकवलेल्या फळांना आणि भाज्यांना ऑनलाइन मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. रघुराज सांगतो, की रासायनिक अवशेष असलेल्या कृषी-उत्पादनांमुळे आजार पसरतात.

शिवाय त्यामुळे जमिनीच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. रघुराज सध्या सेंद्रिय शेतीसह बागकाम, किचन गार्डन आणि शेतीशी संबंधित इतर अनेक कामं करत आहे. रघुराजने सांगितलं, की 2016मध्ये त्याचं बीटेक पूर्ण झालं होतं. त्यानंतर त्याने यमुना पॉवर कंपनीत कामही केलं. या नोकरीदरम्यान त्याने दिल्ली आणि चंडीगड इथल्या अनेक ठिकाणी काम केलं. त्या वेळी त्याच्या असं निदर्शनास आलं, की आपल्या देशातल्या शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीबद्दल फारशी माहिती नाही. म्हणून रघुराजने नोकरी सोडून सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. नोकरी करत असताना रघुराजला वार्षिक 12 लाख रुपयांचं पॅकेज मिळत होतं. सेंद्रिय शेतीतून तो वर्षाला 8 लाख रुपयांपर्यंत कमाई करतो. ही कमाईही सातत्याने वाढत जाण्याची शक्यता आहे. रघुराजनं सांगितलं, की ‘जेव्हा मी वार्षिक 12 लाख रुपये पगाराची नोकरी सोडली आणि लोकांशी सेंद्रिय शेती करण्याबद्दल चर्चा केली तेव्हा अनेकांनी त्याला सांगितलं, की इंजिनीअरिंगनंतर शेती करून काही फायदा नाही. शेती करण्याऐवजी चांगली नोकरी मिळत असेल तर ती केली पाहिजे; पण मी सेंद्रिय शेती करण्याचा निश्चय केला होता त्यावर मी ठाम होतो. आज मी माझ्या निर्णयाबाबत खूश आहे.’

रघुराजच्या शेतातल्या भाज्यांना ऑनलाइन मागणी आहे. आता अनेक जण त्याच्याकडे बागकाम, किचन गार्डन आणि सेंद्रिय शेतीबद्दल माहिती विचारण्यासाठी येतात. रघुराज कमी वेळात आणि कमी वयात अनेकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा मोठा वाटा आहे; मात्र शेतीमध्ये काही फायदा नाही. कष्टाच्या मानाने मोबदला फारच कमी मिळतो, अशी तरुण पिढीची ओरड आहे; मात्र रघुराजसारखे काही उच्चशिक्षित तरुण याला अपवाद ठरत आहेत. ते पारंपरिक शेतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम