माझ्यावर राग काढण्याचे कारण नाही ; छगन भुजबळ !
दै. बातमीदार । १० जुलै २०२३ । राष्ट्रवादीत फुट पाडत अजित पवारांनी सत्ताधारी सोबत जुळवून घेतल्यानंतर शरद पवारांनी थेट राज्याचा दौरा सुरु केला असून याची सुरुवात छगन भुजबळ यांच्या मतदार संघातून केला आहे. येवल्यात शरद पवारांनी थेट छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते त्याला उत्तर छगन भुजबळानी दिले आहे. शरद पवारांना माफी मागावी लागेल, असे कोणतेही काम मी येवल्यात केलेले नाही. शरद पवारांची विकासाबाबत जी भूमिका आहे, त्यानुसारच मी येवल्यात विकासकामे केली आहेत. तरीही माझ्यावर एवढा राग काढण्याचे कारण काय?, असा सवाल कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांना केला आहे.
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी शनिवारपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. पहिलीच सभा त्यांनी बंडखोर छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली. यावेळी राजकारणात माझे अंदाज कधी चुकले नाहीत, पण येवल्यात चुकला. तुम्ही ‘त्यांना’ (भुजबळांना) माझ्यामुळे चारदा निवडून दिले. मी टीका करण्यासाठी आलो नाही तर तुमची माफी मागण्यास आलोय, असे म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली होती. याला छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.
छगन भुजबळ म्हणाले, येवलामध्ये मला उमेदवारी दिली म्हणून शरद पवारांनी काल येवलावासियांची माफी मागितली. माफी मागण्याचे कोणतेही कारण नव्हते. शरद पवारांनी माफी मागावी, असे कोणतेही काम मी येवल्यात केलेले नाही. शरद पवारांनी काल येवला येथे माफी मागितली तर यापुढे जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत गेले त्या सर्व मतदारसंघात ते माफी मागणार आहेत काय? शरद पवार आता काय 40-50 मतदारसंघात माफी मागतील काय?
छगन भुजबळ म्हणाले, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर या निर्णयाविरोधात शरद पवार पहिली सभा दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव या मतदारसंघात घेणार होते. मात्र, त्यांनी ती सभा रद्द केली आणि माझ्या येवला मतदारसंघात सभा घेतली. कदाचित शरद पवारांचे माझ्यावर अधिक प्रेम असावे, म्हणून त्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली असावी. कदाचित शरद पवार यांना वाटत असेल की, जे काही झाल त्यामागे माझी मोठी भूमिका असेल. मात्र, असा समज करून घेणे चुकीचे आहे. शरद पवारांच्या घरातूनच बंड झाले आहे. ते का झाले? याचे आत्मपरिक्षण शरद पवार यांनी करावे. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे साथीदार का सोडून गेले, याचा विचार शरद पवारांनी करावा.
छगन भुजबळ म्हणाले, निवडणुकीत मला शरद पवारांनी येवला मतदारसंघ का दिला, याचा त्यांनाच विसर पडल्याचे दिसत आहे. विधानसभेसाठी 2004 मध्ये माझ्यासाठी एरंडाेल, जुन्नर, वैजापूर, येवला हे पर्याय होते. वडिलांचे गाव असल्याने मला जुन्नरमधूनच लढायचे होते. पण कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने मी जुन्नरऐवजी येवल्यात लढलो. येवला हे मागासलेले असल्याने येथे विकासाचे काम करण्याची संधी होती. त्यामुळेच मी येवल्याचा आग्रह धरला होता. आणि येथून आमदार झाल्यावर मी येथे विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. 2014 मध्ये तुम्ही शिवसेना सोडली, की आम्हीही काँग्रेस सोडू, असे शरद पवारांनी भाजपला सांगितले होते. आमच्या आमदारांची संख्या कमी होती म्हणून आम्ही भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. त्यानंतर 2017 व 2019मध्येही शरद पवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपशी चर्चा केली. शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर केले, असा गौप्यस्फोटही छगन भुजबळ यांनी केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम