मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल !
दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ । देशातील काही राज्यात सुरु झालेली राजकीय रणधुमाळीत आता सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीपूर्वी मे महिन्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात १२ पेक्षा अधिक केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन हा फेरबदल केला जाईल. ऑगस्ट २०२२ पासून पुढे ढकलला फेरबदल अखेर पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.
सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणाऱ्यांसाठी वयाची गाइडलाइन तयार होत आहे. ज्यांचे वय ६५ ते ७०च्या आसपास आहे, त्यांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते. कामगिरीच्या आधारावरही काही मंत्र्यांना डच्चू दिला जाईल. काही जणांवर २०२४ मधील निवडणुकीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नव्या मंत्र्यांचा आधार निखळपणे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि किंवा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील गरज पाहून असेल. पश्चिम बंगाल, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडसारख्या राज्यांतील नेत्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
२०२४ च्या निवडणुका लक्षात घेता बिहार व महाराष्ट्रातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. यात बिहारमधून चिराग पासवान, आरसीपी सिंह यांच्या नावांची तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन केंद्रीय मंत्री केले जाण्याची चर्चा सुरू आहे. एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री पदे शिंदे यांच्या शिवसेनेला दिली जाऊ शकतात.
मंत्र्यांची खातीही बदलणार
सूत्रांनी सांगितले की, सुमारे २० केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होऊ शकतो. सध्या अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे एकपेक्षा जास्त मंत्रालयांचे कामकाज आहे. यात अनुराग ठाकूर, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी, भूपेंद्र यादव, मनसुख मंडविया, धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. यांच्याकडे सध्या एकापेक्षा जास्त मंत्रालयांची जबाबदारी आहे. यापैकी अनेक मंत्री आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असून, यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, २०२४ मध्ये मोदी सरकारच्या राज्यसभेतील काही वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनाही लोकसभा निवडणूक लढण्याचे निर्देश आतापासून दिले आहेत. यात धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव यांच्यासारखे असे सांगितले जाऊ शकते. यातील काही नेत्यांनी तर आपल्यासाठी लोकसभा मतदारसंघाचा शोधही पूर्ण केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम