राज्यासह काही जिल्ह्यात दोन दिवस पाऊस तुफान बरसणार
दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ । हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणखी काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात अजूनही पावसाचा जोर मात्र कायम आहे. त्यामुळे, यंदाची दिवाळीही पावसातच जाणार असल्याचा अंदाज आहे.
दिवाळी काही दिवसांवर आल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. मात्र, पाऊस खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांचा हिरमोड करण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता – मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुणे आणि मुंबईतही अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. दरम्यान उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सूनने परतीचा प्रवास केला आहे. याचबरोबर राज्यातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. पुढील 1-2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम