ही तर लफंगेगिरी म्हणावी लागेल ; ठाकरे गटाने काढला चिमटा !
बातमीदार | ११ ऑक्टोबर २०२३
राज्यातील राष्ट्रवादी व शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे व अजित पवारांनी आपला वेगळा गट स्थापन केल्यानंतर विरोधकांनी यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. अशातच राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाचे? याप्रश्नी निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तीवाद केला जात आहे. दरम्यान, शरद पवार हे हुकूमशहा आहेत व त्यांनी घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. या युक्तीवादावर ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.
“शरद पवार हे घर चालवल्याप्रमाणे पक्षाचा कारभार चालवतात असे अजित पवार म्हणतात. पक्ष घरातलाच असल्यामुळे अजित पवार चार-पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकले व शरद पवार यांचा वरदहस्त होता म्हणूनच ‘ईडी’ने अजित पवारांना तसा हात लावला नाही”, असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे. “शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली तशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली. याच दोन्ही पक्षांनी शिंदे व अजित पवारांसारख्यांना पदे दिली. त्यामुळे मूळ पक्ष महत्त्वाचा. आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी बेइमानी केली हे ठीक, पण त्यांनी मातृपक्षावरच दावा सांगितला ही लफंगेगिरी म्हणावी लागेल”, अशी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली.
“भारतीय जनता पक्ष हे त्यांचे नवे मालक असून मालकाच्या इशाऱ्यावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला जात आहे. शरद पवार हुकूमशहा आहेत, असा आरोप झाला आहे, पण याच ‘हुकूमशहा’ने तुरुंगातून सुटून आलेल्या छगन भुजबळांना मंत्री केले व तुरुंगाच्या वाटेवर असलेल्या हसन मुश्रीफ यांनाही राजवस्त्रे दिली. पवारांच्या कारभारातील ‘हुकूमशाही’ तेव्हा या लोकांना टोचली नाही”, असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला. “ठाकरे नसते तर शिंदे यांना कोणी ओळखले नसते व शरद पवार नसते तर अजित पवार बारामतीत सायकलवरून फिरताना दिसले असते! शिवसेना ठाकऱ्यांची हे पाकिस्तानातसुद्धा कोणीही सांगेल. तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असे सांगितले जाईल, पण आपल्या निवडणूक आयोगास हे माहीत नसावे व उटपटांग पद्धतीने मूळ पक्ष बेइमानांच्या दावणीला बांधला जातो हा प्रकार धक्कादायक आहे”, असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम